‘अग्निपथ’ योजनेमुळे देशात गृह युद्धाचा धोका : माजी आमदार अनिल गोटे | पुढारी

'अग्निपथ' योजनेमुळे देशात गृह युद्धाचा धोका : माजी आमदार अनिल गोटे

धुळे : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने आणलेल्या नवीन सैनिकी योजनेमुळे देशांतर्गत सिव्हिल वॉरचा धोका आहे. आपला देश झपाट्याने हुकूमशाहीकडे निघाल्याची टीका आज माजी आमदार अनिल गोटे यांनी केली. धुळे येथील शहीद अब्दुल हमीद यांच्या स्मारकासमोर आंदोलन करून अग्नीपथ सैन्यभरती योजनेचा त्यांनी निषेध केला.

धुळे येथे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ज्येष्ठ नेते एन. सी. पाटील, पोपटराव सोनवणे, विजय वाघ, महिला आघाडीच्या शोभा आखाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

यावेळी टीका करताना माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले की, या सैन्यभरती योजनेमुळे देशांतर्गत गृह युद्धाचा धोका आहे. कंत्राटी पद्धतीने देशसेवा करता येते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अग्नीपथ योजनेमुळे सैन्यात कंत्राटी पद्धतीने सेवेत दाखल होणाऱ्या युवकांना सेवेच्या काळात शिक्षण घेता येणार नाही. कारण त्यांना पूर्ण वेळ काम करावे लागणार आहे. या कंत्राटी सैनिकांचे वेतनातून साडेसहा लाख रुपये कपात केली जाणार आहे. त्यांनी चार वर्ष नोकरी केल्यानंतर त्यात साडेपाच लाख रुपये सरकार टाकून या युवकांना परतावा देणार आहे. या योजनेचा आपण पूर्ण अभ्यास केला असून ही व्यवहार्य नसल्याचे टीका गोटे यांनी केली आहे.

यापूर्वी जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलर हा सत्तेवर आल्यानंतर त्याने जनतेला रोजगाराची वचन दिल्यामुळे अशा पद्धतीची योजना त्याने आणली होती. त्याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील रोजगाराचे आश्वासन दिले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणत असलेले योजना हिटलरच्या सैन्य भरती योजनेचे भ्रष्ट रूप असल्याची टीका देखील गोटे यांनी केली. आपला देश झपाट्याने हुकुमशाहीच्या दिशेने निघाला असल्याचे हे अशा योजनांमधून दिसून येत असल्याची टीका गोटे यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button