

किशोर खुडे
पारगाव : तब्बल 45 वर्षे ढोलकीपटू म्हणून विविध तमाशांचे फड गाजवले. आज वयाच्या 73 व्या वर्षीही आपल्या जादुई बोटांच्या कलेवर विविध वाद्यांच्या स्पर्धा जिंकल्या. परंतु, शासनदरबारी मात्र मानधन मिळविण्यात आपण लढाई हरलो, अशी खंत प्रसिद्ध ढोलकीपटू पमाजी पंचरास (धामणीकर) यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केली.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी ही गावे नामवंत तमाशा कलावंतांची खाणच, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ढोलकीपटू, हलगीपटू, उत्कृष्ट सोंगाड्या, सनईवादक असे अनेक कलावंत हे लोणी धामणी परिसरात आहेत. त्यातीलच एक ज्येष्ठ गुणी कलावंत म्हणजे पमाजी तुकाराम पंचरास धामणीकर लहानपणापासूनच वाद्यकलेची त्यांना प्रचंड आवड.
तमाशा फडांमध्ये ढोलकीवादनाचे काम ते लहानपणापासूनच करू लागले. वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर या नामवंत तमाशा फडामध्ये त्यांनी अनेक वर्षे ढोलकीवादनाचे उत्कृष्ट काम केले. तब्बल 45 वर्षे तमाशा क्षेत्रात त्यांनी घालवली. आता वय 73 झाले आहे. शरीर साथ देत नाही. एवढे करूनही शासनदरबारी कुठलीही नोंद घेतली गेली नाही.
शासनाकडे एकदा, दोनदा नव्हे, अनेकदा मानधनासाठी प्रस्ताव पाठविले. शासनाने त्यांची दखल घेतली नाही. याबाबत पमाजी पंचरास धामणीकर दै. 'पुढारी'शी बोलताना म्हणाले, 'तब्बल 45 वर्षे तमाशा क्षेत्रात वाहून घेतले. आता वय 73 झाले आहे. शासनाकडे मानधन मिळविण्यासाठी अनेक वर्षे कागदपत्रे रंगवली. परंतु, शासनाला आमची दया आली नाही. शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले. आता शासनाच्या मानधनाचीअपेक्षा कुठलीही राहिली नाही. त्यामुळे येणारा पुढील काळ आमच्यासाठी अतिशय कठीण असणार आहे.
पमाजी पंचरास यांना उत्कृष्ट ढोलकीवादनाची अनेक प्रशस्तिपत्रे, प्रमाणपत्रे मिळाली आहेत. वाद्यकलेच्या विविध स्पर्धा त्यांनी गाजविल्या. त्यांना अनेक मानचिन्हे, सन्मानचिन्हे, ट्रॉफी मिळाल्या. परंतु, याचा जीवन जगण्यासाठी कुठलाही उपयोग होत नसल्याचे पमाजी पंचारास धामणीकर यांनी सांगितले.
हेही वाचा