इचलकरंजीचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार | पुढारी

इचलकरंजीचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार

इचलकरंजी पुढारी वृत्तसेवा :  कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे मजरेवाडीतील एक उपसा पंप बंद झाला आहे. पंचगंगा नदीतही पुरेशी पाण्याची पातळी नसल्यामुळे तिथूनही कमी दाबाने उपसा सुरू आहे. परिणामी, शहराला दोन ते तीन दिवसांतून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडणार आहे.

शहराला 54 एमएलडी पाण्याची गरज आहे. कृष्णा योजनेतून 32 एमएलडी, तर पंचगंगेतून 9 एमएलडी उपसा केला जातो. कृष्णा योजनेच्या गळतीमुळे पूर्ण क्षमतेने पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होतो. सध्या पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे नदीची पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे.

कृष्णा योजनेच्या उपसा पंपाजवळील पातळी कमी झाल्यामुळे एक पंप बंद झाला आहे. केवळ एका पंपातून उपसा सुरू आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी उपसा होत नाही. पंचगंगा उपसा योजनेचीही अशीच स्थिती बनली आहे. तिथूनही कमी उपसा होत आहे. त्यामुळे शहराला दोन ते तीन दिवसांतून पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

कृष्णा नदीची पाणीपातळी खालावली

सध्या दोन्ही नद्यांची पाणी पातळी खालावली आहे. त्याचा उपशावर परिणाम झाला आहे. पाणी प्रवाहित झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे.
– सुभाष देशपांडे, जल अभियंता

हेही वाचा

Back to top button