सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी सुटेना | पुढारी

सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी सुटेना

सिंहगड रोड : पुढारी वृत्तसेवा: सहा महिने उलटूनदेखील सिंहगड मुख्य रस्त्याला असणारे पर्यायी मार्ग खुले झाले नसल्याने अजूनही स्थानिक नागरिकांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे. यावर तातडीने उपाययोजना करायचे सोडून अधिकारी मात्र वाहतूक कोंडीवरील तक्रारीची निवेदने या टेबलावरून त्या टेबलाकडे फिरवण्यातच व्यग्र असल्याचे दिसत आहे.

साधारण सहा महिन्यांपूर्वी सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये आजपर्यंत पर्यायी रस्ते खुले झाले नाहीत. यातील केवळ विश्रांतवाडी ते क्षेत्रीय कार्यालय हा रस्ता सध्या वापरासाठी खुला आहे. मात्र, या रस्त्यावर असणार्‍या लंडन ब्रिजवरदेखील वर्दळीच्या वेळी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांची परिस्थिती आगीतून फुफाट्यात अशीच झाल्याने नागरिकदेखील हवालदिल झाले आहेत.

पर्यायी रस्ता सुरू करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष, सामाजिक आणि सेवा संस्था या सातत्याने ‘फॉलोअप’ घेत आहेत. पथ विभाग, सिंहगड क्षेत्रीय कार्यालय आणि थेट महानगरपालिका येथेदेखील अनेकांनी निवेदने, विनंतीपत्रे, तक्रारी दाखल केल्या आहेत. सिंहगड क्षेत्रीय कार्यालयात यासाठीच्या पत्रांचा ढीग लागला आहे, असे असतानादेखील संबंधित अधिकारी एकमेकांकडे पर्यायी रस्त्याचा चेंडू भिरकावत असल्याने पर्यायी रस्त्याला पर्यायच नसल्याचे दिसून येत आहे.

लोकप्रतिनिधीदेखील थंडावले

पालिकेची मुदत संपल्यामुळे लोकप्रतिनिधींना असलेले अधिकारदेखील संपुष्टात आल्याने लोकप्रतिनिधीदेखील अधिकार्‍याचा फॉलोअप घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी अधिकार्‍यांना पळविणारे लोकप्रतिनिधीदेखील याबाबतीत थंडावल्याने नक्की पर्यायी रस्ते कधी खुले होणार, हा प्रश्न अजूनही गुलदस्त्याच आहे.

पर्यायी रस्त्यांसाठी यापूर्वीदेखील निवेदने दिली होती. मात्र, अजूनही त्यावर रस्ते खुले कधी होणार याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. क्षेत्रीय कार्यालयात याबाबत मुख्य खात्याशी पत्रव्यवहार केला असून आगामी 15 दिवसात पर्यायी रस्ते खुले न झाल्यास रिक्षाचालक, टेम्पोचालक, कारचालक व दुचाकीस्वार सगळ्यांना घेऊन हा प्रश्न मनसे स्टाईलने सोडविण्यात येणार आहे.

                   – शिवाजी मते, शहराध्यक्ष, मनसे वाहतूक सेना

 

Back to top button