नाशिक : सॉफ्टवेअरच्या सहाय्याने इम्पिरिकल डेटा गोळा करणे म्हणजे गावंढळपणा | पुढारी

नाशिक : सॉफ्टवेअरच्या सहाय्याने इम्पिरिकल डेटा गोळा करणे म्हणजे गावंढळपणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी समर्पित आयोगाची नेमणूक करण्यात आली आहे. यंत्रणेच्या वतीने चुकीच्या पद्धतीने डेटा गोळा करण्यात येत आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करणे म्हणजे शुद्ध गावंढळपणा असून, या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बुधवारी (दि.15) जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक महानगरपालिका येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांची भेट घेत निवेदने सादर केली. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी नाना महाले, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर दराडे, जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी व शहर कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, सरचिटणीस संजय खैरनार, ओबीसी सेलचे सुरेश आव्हाड आदी उपस्थित होते.
दरम्यान, निवेदनात म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठीत केला आहे. या आयोगाने सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इम्पिरिकल डेटा दारोदार जाऊन ओबीसींची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होती. परंतु अशा प्रकारे माहिती संकलित न करता सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित केली जात आहे, ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक असल्याचे म्हटले आहे.
तसेच सॉफ्टवेअरवर सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीची माहिती जमा करणे म्हणजे ओबीसी समाजाचे भविष्यातील कायमस्वरूपी कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे.

त्यामुळे समर्पित आयोगाद्वारे चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तत्काळ थांबविण्यात यावे व तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्यामार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासनामार्फत माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावे. अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभर तीव— स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button