जागतिक कासव दिन विशेष : काशी विश्वेश्वर, मनकर्णिका कुंडात कासव संवर्धन शक्य | पुढारी

जागतिक कासव दिन विशेष : काशी विश्वेश्वर, मनकर्णिका कुंडात कासव संवर्धन शक्य

आशिष शिंदे

कोल्हापूर : जगभर कासव दिन साजरा होत असताना कोल्हापुरात मात्र कासव संवर्धनाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे समोर आले आहे. अंबाबाई मंदिरालगत असलेल्या काशी विश्वेश्वर कुंडात पूर्वी कासवाचे दर्शन होत असे; मात्र कचर्‍याने हा कुंड भरून गेल्याने कासव दर्शन बंद झाले आहे. अनेक घोषणा झाल्या; मात्र कुंडातील कचरा बाहेर आलाच नाही. त्या पार्श्वभूमीवर जुना राजवाड्यातील तुळजाभवानी मंदिरातील हौदात कासवांचे चांगले संवर्धन झाले आहे. याच धर्तीवर काशी विश्वेश्वर कुंडात कासवांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

घाटी दरवाजालगत काशी आणि मनकर्णिका ही दोन कुंड आहेत. यापैकी पूर्वी बुजवलेले मनकर्णिका कुंड आता खुले करण्यात आले आहे. त्याचे संवर्धन करण्यात येणार असून त्याचे काम सुरू आहे. तेथे पूर्ववत दगडी घाट करण्यात येणार असून त्याचे दगड घडविले जात आहेत. याच धर्तीवर काशी कुंडाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. या कुंडात पूर्वी कासवांचे अस्तित्व होते. अंबाबाईला आलेले भाविक कुंडावर असलेल्या जाळीतून कासवांना तांदळाचे दाणे टाकत आणि कासव दर्शन घेत; मात्र हा कुंड पूर्णपणे कचर्‍याने भरून गेला आहे. यापूर्वी या कुंडातील गाळ एकदा काढण्यात आला होता. तेथे कासवांचे संवर्धन करण्याचे ठरले होते; मात्र अनेक घोषणांप्रमाणे ही घोषणासुद्धा हवेत विरुन गेली. दरम्यान, कात्यायनी मंदिरासमोरील दगडी कुंडात कासवांचे संवर्धन झाले आहे. आता मनकर्णिका कुंडाबरोबर काशी कुंडाचे संवर्धन करून तेथे कासवांचे संवर्धन करता येईल.

पर्यावरणद़ृष्ट्या कासवांचे महत्त्व खूप आहे. अंबाबाईच्या मंदिरात येणारे पावसाचे पाणी आता चॅनेल काढून वळवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही कुंडात कासवांचे चांगल्या प्रकारे संवर्धन करता येईल. जगभर कासव वाचवा चळवळ सुरू आहे. त्याला चांगल्याप्रकारे हातभार लावता येईल; मात्र त्या द़ृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.

शहरातील वारसा वास्तू म्हणून हे ठिकाण अतिशय महत्त्वाचे आहे. मनकर्णिका कुंडाप्राणे हे कुंड स्वच्छ करून पूर्ववत करणे शक्य असून यामध्ये पूर्वीप्रमाणे कासव संवर्धन करता येईल. यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे.
– उदय गायकवाड,
पर्यावरण अभ्यासक

Back to top button