Dhule Crime News | आराम बस चालकांना चाकूचा धाक दाखवून लूटणाऱ्या दोघांना अटक  | पुढारी

Dhule Crime News | आराम बस चालकांना चाकूचा धाक दाखवून लूटणाऱ्या दोघांना अटक 

धुळे : पुढारी वृत्तसेवा- गुजरात राज्यातून येणाऱ्या आराम बस चालकांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या दोघांच्या मुसक्या धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन यांनी आवळल्या आहे. या दोघा संशयीतांकडून गुंगीकारक औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

धुळे शहर पोलीसांना डायल ११२ वर कॉल प्राप्त झाला. यात भिमनगर समोरील साक्री रोडवर दोन अज्ञात इसम हे सुरतकडून येणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकास थांबवून त्याचेकडून पैसे जबरदस्तीने घेत असल्याबाबत मदतीसाठी कॉल प्राप्त झाला.

त्यानुसार असई नितीन चौधरी पोकॉ श्रीकांत सुर्यवंशी व रात्री गस्तीवर असणारे पोकॉ पगारे व वसंत कोकणी असे भिम नगर येथे जावून ट्रॅव्हल्स चालकास भेटून त्याचेकडून अज्ञात इसमांची देहबोली बाबत चौकशी केली. यातुन दोन तरुण मुले वय अंदाजे १८ ते २२ दरम्यान, एका मुलाने डोक्यात टोपी घातली असून बोलतांना अडखळत बोलणारा व एकाचे अंगात काळया रंगाचे टी शर्ट असलेल्या मुलांनी चाकूचा धाक दाखवून इन्ट्री के पाचसो रुपये दे अशी धमकी देवुन पैसे घेवून पळून गेले. ट्रॅव्हल्स मधील प्रवाशांना वेळेवर सोडण्यासाठी ट्रॅव्हल्सचा चालक गाडी घेऊन निघून गेली मात्र ते तक्रार देण्यासाठी नंतर देण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.

त्या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धिरज महाजन यांनी तपासाची सूत्रे हलवली या अंतर्गत पळून गेलेल्या दोन्ही मुलांची व्हीडीओ प्राप्त झाले. त्या आधारे पोलीस धिरज महाजन यांनी व्हीडीओ.ची पडताळणी करुन खात्रीलायक बातमीवरुन त्यांचे नावे आकाश वणाजी अहिरे उर्फ वण्या व त्याचा साथीदार नामे हर्षल उर्फ काली शांताराम कांबळे, दोन्ही राहणार भिमनगर साक्री रोड, धुळे अशांची नावे निष्पन्न केली. साखरी रोडवर याच दोघांनी शास्त्राचा भाग दाखवून आरंभस चालकाकडून पाचशे रुपये उकळण्याची माहिती स्पष्ट झाल्याने उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी तसेच पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी तपास पथक तयार केले.

पळण्याचा प्रयत्न पाडला हाणून

या शोध पथकास संशयीत वण्या अहिरे व काली कांबळे यांचा शोध घेता ते शनि नगर रोडवरील बंद पडलेली पडीत म.न.पा. शाळा क्रमांक १४ येथे नशापाणी करीत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस अधिकारी व शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी म.न.पा. शाळा क्रमांक १४ येथे घेराव घालून अडखळत बोल असलेला वण्या अहिरे व काली कांबळे या दोघांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस आल्याचे पाहून या दोघांनीही पलायन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न शोध पथकाने हाणून पाडत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सुमारे 2100 रुपये किमतीच्या कोरेक्स कंपनीच्या 12 बाटल्या आणि नशेसाठी वापरली जाणारी गोळ्यांची स्ट्रीप तसेच दोन दुचाकी असा 58 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

घटनेची पोलिसांकडून गंभीर दखल

धुळे शहरात अशा पद्धतीने लुटीच्या हा प्रकार घडल्याने त्याची पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे ,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, यांनी गंभीर दखल घेतली असून उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी आणि पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी या घटनेचा सविस्तर तपास सुरू केला आहे. ताब्यात घेतलेल्या या दोघा आरोपींनी आणखी काही वाहनांची लूट केली आहे किंवा कसे, याबाबतची माहिती तपासून पहिली जात आहे.

हेही वाचा –

Back to top button