Virat Kohli | क्रिकेटपटू विराट कोहली ‘इसिस’च्या निशाण्यावर! | पुढारी

Virat Kohli | क्रिकेटपटू विराट कोहली ‘इसिस’च्या निशाण्यावर!

अहमदाबाद; वृत्तसंस्था : भारतीय संघाचा माजी कर्णधार, कोट्यवधी क्रिकेट शौकिनांच्या गळ्यातील ताईत विराट कोहली हा ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या निशाण्यावर असल्याची माहिती बुधवारी उघडकीला आल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

‘आयपीएल’अंतर्गत कोहली ‘आरसीबी’कडून खेळत आहे. ‘आरसीबी’ संघ अहमदाबादेत दाखल झाला, त्याच दिवशी येथील विमानतळावर ‘इसिस’च्या 4 दहशतवाद्यांना अटक झाली. चौकशीतून विराट कोहली हा या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होता, असे संकेत मिळताच आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यापूर्वी ‘आरसीबी’ला आपला सराव रद्द करावा लागला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (आरसीबी) एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्सशी (आरआर) नियोजित होता आणि हे वृत्त समोर आले. सुरक्षेच्या कारणावरून सामन्यापूर्वीचे एकमेव सराव सत्र रद्द करावे लागले. विराट कोहलीच्या सुरक्षेचे कारण त्यामागे होते. मंगळवारी हे सराव सत्र अहमदाबादेतील गुजरात कॉलेज ग्राऊंडवर होणार होते. ‘आनंदबाजार पत्रिका’ या दैनिकाच्या वृत्तानुसार, एलिमिनेटर सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदही या धोक्यामुळे रद्द केली. सराव सत्र आणि पत्रकार परिषदेचे आयोजन रद्द करण्यामागे गुजरात पोलिसांनी दिलेले संकेत कारणीभूत होते. विराट कोहलीच्या सुरक्षेची चिंता मुख्य म्हणजे त्यामागे होती.

दहशतवाद्यांची कबुली

गुजरातेतील अहमदाबाद विमानतळावरून अटक करण्यात आलेल्या ‘इसिस’च्या चौघा दहशतवाद्यांनी अहमदाबादसह भारतात ठिकठिकाणी मोठ्या हल्ल्यांच्या कटात सहभागी असल्याची कबुली दिली आहे. चौघे दहशतवादी श्रीलंकेचे नागरिक असून, सतत पाकिस्तानी सूत्रधाराच्या संपर्कात होते आणि त्याच्या सूचनेवरून कटाची अंमलबजावणी करणार होते, असेही त्यांनी चौकशीत सांगितले. अहमदाबादमध्ये त्यांच्यासाठी शस्त्रे व दारूगोळ्याची व्यवस्था करून ठेवण्यात आली होती. येथून ती ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानी हँडलर कुठे आणि कधी हल्ला करायचा ते सांगणार होता. विराटसह अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये नियोजित ‘आयपीएल’चे सामनेही या दहशतवाद्यांचे पहिले लक्ष्य असल्याचा कयास यातून बांधला जात आहे. चार संशयितांच्या फोनमधून उपलब्ध झालेल्या माहितीवरून अहमदाबादमधील एका ठिकाणाहून 3 पिस्तूल आणि काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत, असे एका तपास अधिकार्‍याने सांगितले.

मोहम्मद नुसरत, मोहम्मद नुफ्रान, मोहम्मद फारिस आणि मोहम्मद रझदीन अशी या दहशतवाद्यांची नावे असून, चौघे श्रीलंकेचे नागरिक आहेत. चौघांच्या अटकेनंतर दुसर्‍या दिवशी अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल क्वालिफायर-1, तर तिसर्‍या दिवशी एलिमिनेटर सामने नियोजित होते, हे विशेष! सुरक्षेच्या कारणास्तव मोदी स्टेडियममध्ये सामन्याच्या वेळी प्रेक्षकांमध्ये ठिकठिकाणी साध्या वेशातील सुरक्षा कर्मचारीही मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेले होते.

Back to top button