नंदुरबार : अक्कलकुव्यात जमावाकडून दगडफेक ; वाहनांची तोडफोड | पुढारी

नंदुरबार : अक्कलकुव्यात जमावाकडून दगडफेक ; वाहनांची तोडफोड

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : अक्कलकुवा येथे शुक्रवारी रात्री अचानकपणे जमावाने तुफान दगडफेक करत  तोडफोड करत वाहने पेटवून दिली. या प्रकारामुळे अक्कलकुवा शहर हादरून गेले. जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील आणि प्रमुख अधिकारी तातडीने अक्कलकुव्यात पोलीस ताफ्यासह  दाखल झाले. आज  याप्रकरणी २० हून अधिक संशयित आराेपींना अटक करण्यात आली आहे.

एका ग्रुपवरील वादग्रस्त व्हॉट्स ॲप स्टेटसमुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या स्टेटस विषयी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. अक्कलकुवा पोलीस ठाण्यातून तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या मुख्यालयातून या घटनेविषयी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. हिंसक जमावाने अक्कलकुवा शहरातील मुख्य बाजारपेठ, तळोदा नाका परिसर, झेंडा चौक, मरीमाता मंदिर परिसर येथील घरांना आणि वाहनांना तसेच दुकानांना लक्ष्य केले होते.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी तत्काळ जिल्ह्यातील धडगांव पोलसी ठाणे, विसरवाडी पोलीस ठाणे, मोलगी पोलीस ठाणे, सारंगखेडा, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथून अतिरिक्त पोलीस फौजफाटा अक्कलकुवा येथे पाठविला. तसेच ते स्वतः अक्कलकुवा येथे दाखल होऊन ज्या ज्या ठिकाणी दगडफेक व वाहनांचे नुकसान झालेले होते. त्या ठिकाणी भेटी देवून परिस्थितीची पाहणी केली. काही समाजकंटकांनी एका पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केल्यामुळे त्याबाबत देखील गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. घडलेल्या घटनेबाबत गुन्हा दाखल करुन आरोपींना तत्काळ अटक करुन त्यांच्याविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले. विविध कलमांतर्गत तसेच सार्वजनिक संपत्तीची हानी प्रतिबंधक कायदा कलम 7 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (१)(३) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे वेगवेगळे पथके तयार करुन आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी रवाना केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या संपूर्ण परिसरात आज दगड विटांचा खच पडलेला दिसला. अनेक दुचाकींची नासधूस झालेली पाहायला मिळाली. काही चारचाकी वाहनांच्या काचा फोडून आणि बोनेटवर दगड घालून नुकसान केले आहे. काही दंगेखोरांनी वाहनांची जाळपोळ करीत नुकसानही केले. परंतु या दगडफेकीत किती जखमी झाले, किती नुकसान झाले, याचीही अधिकृत माहिती पोलिसांकडून अद्याप देण्यात आलेली नाही.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतप्त भावना आहेत. तक्रार देऊन परतणाऱ्या जमावाच्या हाती अचानक एवढा दगड साठा कुठून आला? ही दंगल नियोजित होती काय? असे प्रश्न स्थानिक नागरिकांतून विचारले जात आहेत.

. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून अक्कलकुवा येथील अनेक सोशल मीडिया ग्रुपची तपासणी केली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अक्कलकुवा येथील शांतता समितीची बैठक बाेलवल्‍याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button