नंदुरबारला एलसीबीची धडाकेबाज कारवाई ; एका घरातून 6 लाखांचा गुटखा जप्त | पुढारी

नंदुरबारला एलसीबीची धडाकेबाज कारवाई ; एका घरातून 6 लाखांचा गुटखा जप्त

नंदुरबार : एलसीबीने टाकलेल्या धाडीत नंदुरबार मधील पटेलवाडीतील एका घरात 6 लाख ४२ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याने विमल गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अब्दुल हमीद शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नंदुरबार शहरासह ग्रामिणभागात टपऱ्या व दुकानांवरती राजरोसपणे गुटखा विक्री होत असताना आणि मध्य प्रदेश व गुजरात राज्याच्या सीमेवरून गुटख्याची रोज तस्करी होत असतांना कारवाई का होत नाही? असा प्रश्न या कारवाईमुळे चर्चेत आला आहे.

दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून, पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी त्वरीत दखल घेऊन धडक कारवाई सुुरू केली. अक्कलकुवा पाठोपाठ नंदुरबार येथे मोठा साठा जप्त करून एलसीबीच्या पथकाने आतापर्यंत सव्वा आठ लाखाचा एकूण गुटखा जप्त केला आहे. पोलीस सूत्रांनुसार, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना नंदुरबारातील पटेलवाडीत एका घरात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एलसीबीचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कारवाईच्या सूचना दिल्या. कळमकर यांनी लागलीच एक पथक तयार करून कारवाई केली. पटेलवाडीतील एका घरावर छापा टाकला. तेथे अब्दुल हमीद शेख हा व्यक्ती आढळून आला. त्याला घरात गुटखा ठेवल्याची माहिती असून तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले. झडती घेतली असता घरातील एका बाजूला पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या गोण्या आढळून आल्या. त्यात अवैध गुटखा असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी एकूण सुगंधीत तंबाखूची ९ हजार ३२७ पाकिटे जप्त केली. त्यांची किंमत सहा लाख ४२ हजार ३०० रुपये इतकी आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अब्दुल हमीद शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक निरीक्षक संदीप पाटील, हवालदार राकेश वसावे, जितेंद्र तांबोळी, अभिमन्यू गावीत, दीपक न्हावी, अभय राजपूत यांनी केली.

अशीच कारवाई दोन दिवसापूर्वी अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली. खापर गावातील ओम शांती गुरु किराणा दुकानात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेल्या विमल गुटख्याच्या 1 लाख ८१ हजार आठशे रुपये किमतीचा विमल गुटख्याचा मुद्देमाल मिळून आला. याबाबत पोलीस नाईक मनोज सुदाम नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी आशिष रमेशचंद जैन रा. खापर व दलपतसिंग लालसिंग राजपुरोहित रा. खापर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button