अफवा पसरविणार्‍यांकडे दुर्लक्ष करा : महसूलमंत्री थोरात | पुढारी

अफवा पसरविणार्‍यांकडे दुर्लक्ष करा : महसूलमंत्री थोरात

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा

निळवंडेच्या दोन्ही कालव्यांच्या कामासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सातत्याने मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यामुळे दोन्ही कालव्यांची कामे अत्यंत वेगाने सुरू असून ऑक्टोबर 2022 पर्यंत दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. मात्र ज्यांचे याकामामध्ये कोणतेही योगदान नाही.

तेच आता पाण्याबाबत काहीही अफवा पसरवत आहे. त्याकडे दुर्लक्ष करा, असा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 च्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ हे होते.

आ. डॉ. सुधीर तांबे, कांचन थोरात, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. प्रेरणा शिंदे, रामहरी कातोरे, मधुकरराव नवले, नवनाथ आरगडे, अजय फटांगरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. मंत्री थोरात म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून पिण्याच्या पाणी योजनेसाठी 616 कोटी रुपये तर तलाव दुरुस्तीसाठी 32 कोटी रुपयांचा निधी मिळवीला आहे. शहराच्या चारही रस्त्याच्या चौपदरी करणाचे काम सुरू आहे. मात्र ज्यांना संगमनेरमध्ये चांगले काम चालू आहे. ते काहींना पहावत नाही. जे बाहेरच्या भूलथापांना बळी पडतात. ते विनाकारण जनतेमध्ये येऊन गैरसमज पसरवत आहेत.

थोरात कारखान्याने अत्यंत चांगले काम केले आहे. कार्यक्षेत्राबरोबर इतर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करण्यास मोठी मदत केली आहे. संगमनेरच्या सर्व सहकारी संस्था अत्यंत चांगल्या सुरू आहे. त्या राज्यात एक नंबर आहे. मात्र हे काहींना पाहवत नाही आणि त्यामुळे ते संगमनेरमध्ये येऊन टीकाटिप्पणी करत असतात. शहराला चोवीस तास पाणी मिळत असतानाही याबाबत टीका करणार्‍यांनी शहरात दररोज मुबलक पाणी कोठुन येत हे पाहून घ्यावे. ज्ञान येते कुठून हा मोठा प्रश्न आहे.

यापुढील काळात कारखाना कार्य क्षेत्रातील व बाहेरही ऊस उत्पादकांनी नोंद करणे अत्यंत गरजेचे आहे. यावर्षी सुमारे एक हजार हेक्टर उसाची नोंद नसल्याने नियोजनामध्ये काही अडचण झाली म्हणून शेतकर्‍यांनी नोंदणी केली पाहिजे. त्याचबरोबर हेक्टरी उत्पादन वाढवण्यावर ही भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ म्हणाले की, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने या वर्षी पंधरा लाख 51 हजार मेट्रिक टनाचे उच्चांकी गाळप केले आहे. यामध्ये सर्व कर्मचारी, सभासद, ऊस उत्पादक व संचालक मंडळाचे एकत्रित असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर थोरात साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

सेवानिवृत्त 37 कर्मचार्‍यांचा गौरव
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्यातील 37 कर्मचारी चालू वर्षांमध्ये सेवानिवृत्त झाले आहे. त्या सर्व सेवा निवृत्त कर्मचारी यांचा सपत्नीक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आंबा वृक्ष, शाल भेटा अमृतमंथन व अमृत गाथा देऊन सन्मान करण्यात आला.

Back to top button