पुणे-कोलाड रस्त्याच्या संथ कामाबद्दल मुंबईत बोलावली बैठक | पुढारी

पुणे-कोलाड रस्त्याच्या संथ कामाबद्दल मुंबईत बोलावली बैठक

पिरंगुट : पुढारी वृत्तसेवा

पुणे-कोलाड महामार्ग तयार करत असलेल्या ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता प्रशांत आवटी यांनी शुक्रवारी (दि. 10) मुंबई येथे तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियंता श्रुती नाईक यांनी दिली.

पुणे-कोलाड महामार्गाचे संथ गतीने काम सुरू असल्याने ठेकेदाराच्या विरोधात मुळशीकरांनी अनेक वेळा आंदोलने केली. परंतु काम काही वेगाने होत नसल्याने पिरंगुट ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले होते.

पिरंगुट हे बाजारी गाव असल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच या परिसरात अनेक औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे याच रस्त्याने परिसरातून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते आणि नेमके त्याच ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट राहिल्यामुळे गेले दोन महिने दररोज वाहतुकीचा खोळंबा होत आहे. स्थानिक नागरिकांना आणि व्यापार्‍यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 7) पिरंगुट व्यापारी महासंघ आणि ग्रामस्थ यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले. यावेळी ठेकेदाराने रस्त्याचे काम वेळेत केले नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे ग्रामस्थांनी सांगितले.

काम करण्यासाठी मुबलक साहित्य मिळत नसल्यामुळे कामाला विलंब होत असल्याचे कारण देत असून ठेकेदाराला वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही ते कामाला विलंब करत असल्याचे समोर येत असून काम वेळेत झाले नाही, तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– श्रुती नाईक, अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

Back to top button