Nashik : वैतरणा धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवणार- जलसंपदामंत्री पाटील यांचे आश्वासन | पुढारी

Nashik : वैतरणा धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवणार- जलसंपदामंत्री पाटील यांचे आश्वासन

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
वैतरणा धरणग्रस्त व शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले. मुंबई येथे आमदार हिरामण खोसकर यांच्यासह वैतरणा धरणग्रस्त व शेतकर्‍यांची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत वैतरणा धरणातील संपादित जमिनी शेतकर्‍यांना परत कराव्या याबाबत आमदार खोसकर यांनी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा सुरू ठेवला होता. याबाबत शासनाने संमती दर्शवली असून, मूल्यांकन व मोजमाप करून जमिनी मूळ मालकांना परत करण्याबाबत शासनस्तरावर आदेश होऊनही अद्याप जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनाकडून मूळ शेतकर्‍यांचे नावे जमीन हस्तांतरित करून उतारा नावे होण्यास दिरंगाई होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार खोसकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

तसेच तालुक्यातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना मुंबई महानगरपालिकेला व मराठवाड्यात नांदूरमधमेश्वर प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा करणार्‍या इगतपुरी तालुक्यातील धरणांतील प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मुंबई महानगरपालिकेत व औरंगाबाद/जालना जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये कायमस्वरूपी नोकर्‍या मिळाव्यात, अशी ठाम भूमिका मांडली.

यावेळी माजी आमदार शिवराम झोले, संदीप गुळवे, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, उमेश खातळे आदींसह स्थानिक शेतकरी, विविध सरपंच, पदाधिकारी यांनी गेल्या 30 ते 40 वर्षांपासून प्रलंबित स्थानिक शेतकर्‍यांच्या समस्यांना वाचा फोडून प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा मंत्रिमहोदयांसमोर मांडल्या.

हेही वाचा :

Back to top button