रुग्णालय कर्मचारी वसाहतीसाठी 23 कोटी, आमदार आशुतोष काळेंची माहिती | पुढारी

रुग्णालय कर्मचारी वसाहतीसाठी 23 कोटी, आमदार आशुतोष काळेंची माहिती

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील संवत्सर येथे 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी वसाहतीसाठी महाविकास आघाडी सरकारने 22.78 कोटी निधी मंजूर केल्याची माहिती श्रीसाईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी दिली.
आरोग्याबाबत सर्वांनी किती जागृत राहिले पाहिजे, हे जीवघेण्या कोरोना महामारीने दाखवून दिले.

कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यात आलेल्या अडचणी भविष्यात येऊ नये, यासाठी आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याचा आ. काळे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना अपेक्षित यश देखील मिळाले आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास महाविकास आघाडी सरकारने उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देवून 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय म्हणून मंजुरी देखील दिली आहे.

आत्महत्या नव्हे, तर मुलीला पेटवले

माहेगाव देशमुख या ठिकाणी देखील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम प्रगतिपथावर आहे. पूर्व भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा जवळच्या गावात उपलब्ध व्हाव्या, या उद्देशातून तिळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास मंत्रालय स्तरावरील मान्यता मिळावी, यासाठी आ. काळे प्रयत्न करीत आहेत.

तालुक्याच्या पूर्व भागातील मोठी लोकसंख्या व विस्ताराने मोठे असलेल्या संवत्सर व लगतच्या पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी ग्रामीण रुग्णालय गरजेचे होते. त्या प्रयत्नांना यश मिळून या ग्रामीण रुग्णालयासाठी 17.15 कोटी, कर्मचारी वसाहतीसाठी 5.63 कोटी असा एकूण 22.78 कोटी निधीस महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिली आहे.

आरोग्याबाबत लवकरच होणार स्वयंपूर्ण..!

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालयास महाविकास आघाडी सरकारकडून प्रशासकीय मान्यता मिळवत 28.84 कोटीचा निधी आणला आहे. माहेगाव देशमुख येथे सुरू असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र येत्या काही महिन्यांत आरोग्य सेवा देण्यास सज्ज होणार आहे. तिळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास लवकरच मंत्रालय स्तरावरील मान्यता मिळणार आहे. नुकतेच संवत्सरला 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी वसाहतीसाठी महाविकास आघाडी सरकारने 22.78 कोटी निधी मंजूर केल्यामुळे कोपरगाव मतदारसंघ आरोग्याबाबत लवकरच स्वयंपूर्ण होईल, असे आ. आशुतोष काळे यांनी स्पष्ट केले.

Back to top button