सिल्लोड : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेत जीवन संपवले | पुढारी

सिल्लोड : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेत जीवन संपवले

केऱ्हाळा; पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन जीवन संपविले. गळफास घेण्यापूर्वी त्याने व्हॉट्सॲपवर ‘गुड बाय जिंदगी’ अशा अशयाचा मजकुर स्टेटसला ठेवल्याचे समोर आले आहे.

अधिक माहिती अशी की, केऱ्हाळा येथील गोकुळ विठ्ठल दारुंटे (वय 29) या युवा शेतकऱ्याने कर्जला कंटाळून गुरुवारी (दि. 9) दुपारी व्हॉट्सॲपवर गुड बाय जिंदगी अशा अशयाचा मजकुर स्टेटसला ठेवत गळफास घेऊन जीवन संपवले. गोकुळ दारुंटे या शेतकऱ्याकडे गट क्र. 432 मध्ये 71 गुंठे जमीन असून त्याच्यावर स्टेट बँक आँफ इंडियाचे 2 लाख 50 हजार, अँक्सिस बँकेचे चार लाख 25 हजार तर खाजगी फायनान्स कंपनीचे 70 हजार रुपये कर्ज होते. असे सर्व खाजगी व शासकीय बँकेचे मिळून एकून सात लाख 45 हजार रुपये इतके कर्ज होते. यापैकी अँक्सेस बँकेच्या कर्जाचे काही हप्ते गोकुळ यांनी भरले आहेत. तर काही थकित आहेत.

मागील वर्षी शेतीतून मुबलक उत्पन्न मिळाले नाही. मागचेच कर्ज अजून फिटले नाही तर या वर्षीच्या शेती मशागतीसाठी व कर्ज फेडण्यासाठी पैसा आणायचा कुठून? अशा विंवचनेने गोकुळ त्रस्त होता. अखेर कर्जाला कंटाळून त्याने गुरुवारी दुपारी झाडाला गळफास घेत जीवन संपविले.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी गोकुळला तातडीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गोकुळ यांच्या पशचात पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, 4 वर्षाची मुलगी, आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

Back to top button