नाशिक : युवा पिढीला मूल्यशिक्षण देणे गरजेचे : अण्णासाहेब मोरे | पुढारी

नाशिक : युवा पिढीला मूल्यशिक्षण देणे गरजेचे : अण्णासाहेब मोरे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
युवा पिढी संस्कारक्षम असली, तर देशात आदर्श नागरिक निर्माण होतील. त्यासाठी मूल्यशिक्षण देणे गरजेचे आहे. संस्कार डोक्यावर न करता, ते अंत:करणावर झाले पाहिजे. कारण संस्कार टिकले, तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली, तर धर्म टिकेल आणि यातूनच देशाचा खर्‍या अर्थाने विजय होईल, असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थपीठाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांनी केले.

पवननगर येथील स्टेडियममध्ये ‘अमृततुल्य हितगुज’ या सत्संगात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. सीमा हिरे, मंदा मोरे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी नगरसेवक मुकेश शहाणे उपस्थित होते. सत्संगाचे संयोजक सेवेकरी तथा माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी प्रास्ताविक केले. मोरे म्हणाले की, समाजाचे मनोधैर्य वाढवणे आणि व्यसनमुक्ती करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. संस्कारक्षम पिढी घडली, तर वृद्धाश्रम कमी होतील. ज्येष्ठांच्या नशिबी येणारा हा वनवास खर्‍या अर्थाने संपेल. आई-वडिलांना आणि वडीलधार्‍यांना दुःख होणार नाही, याची काळजी युवा पिढीने घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी, यावेळी पवननगर येथील मुख्य रस्त्याचा परमपूज्य गुरुमाउली अण्णासाहेब मोरे मार्ग असा नामकरण सोहळा रिमोटद्वारे आणि फुलांच्या वर्षावात डिजिटली पार पडला. पवननगर स्वामी समर्थ केंद्रातून कलशयात्रा काढण्यात आली. माजी नगरसेविका वत्सला खैरे, प्रतिभा पवार, कावेरी घुगे, छाया देवांग, शीला भागवत, नीलेश ठाकरे, बाळासाहेब पाटील, देवा वाघमारे, सुनील जगताप, पवन कातकाडे, वंदना पाटील, सुरेखा निकम यांचा संयोजकांतर्फे सत्कार केला. अंकुश वराडे, प्रदीप चव्हाण, पंकज बोरसे, सोनू केदारे, वाल्मीक मटाले, आनंद आडले, मदन जमदाडे, किरण गाडे, हेमंत नेहते, अनिकेत कदम आदींनी संयोजन केले होते.

हेही वाचा:

Back to top button