कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिन; आज विविध कार्यक्रम | पुढारी

कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिन; आज विविध कार्यक्रम

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
शिवछत्रपतींच्या 348 व्या राज्याभिषेक दिना निमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मिरवणूक, ब्राह्मण सभा करवीरतर्फे व्याख्यानमाला, तर शिवराज्याभिषेक सोहळा समिती व मराठा तितुका मेळवावा, प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये स्वराज्यगुढी उभारण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या कागलकर वाड्याच्या प्रांगणात शिवरायांचा जन्मकाळ ते शिवराज्याभिषेक दिनापर्यंतच्या महत्त्वाच्या घटनांचे दर्शन होणार आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सोमवारी सायंकाळी चार वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे. मंगळवार पेठेतून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. ब-ाह्मण सभा करवीर, कोल्हापूर यांच्यावतीने मंगलधाम येथे सायंकाळी 6 वाजता, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन या विषयावर चारुदत्तबुवा आफळे यांचे व्याख्यान होणार आहे. तर मराठा तितुका मेळवावा, प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या वतीने संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष मोरे गुरुजी, इतिहास संशोधन मंडळ पुणेचे बालाजी काशीद, इतिहास अभ्यासक रोहित पेरे-पाटील यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता पालखी पूजन कार्यक्रम होणार आहे.

त्यानंतर क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा यांचे शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक होणार आहे. सकाळी 9 ते 10 या वेळेत शिवराज्याभिषेक पूजन आणि दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी चौक आणि निवृत्ती चौक येथील शिवरायांच्या पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे सकाळी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीताचे गायन करण्याचे आवाहन शासनाच्या ग्रामविकास विभागाने केले आहे.

शिवाजी विद्यापीठात विविध कार्यक्रम
शिवाजी विद्यापीठात सोमवारी (दि. 6) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी 10.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र येथे गडकिल्ले चित्र प्रदर्शनाचे कुुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. सकाळी 11.30 वाजता स्वराज्यातील गडकिल्ल्यांवरील माहितीपट (किल्ले जिंजी) दाखविला जाईल. दुपारी 12 वाजता ऐतिहासिक मराठी चित्रपट ‘गनिमी कावा’ दाखविण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता मानव्यशास्त्र सभागृहात शहाजी महाविद्यालयातील प्रा. डॉ. शिवाजी जाधव यांचे ‘पन्हाळगडचा इतिहास’ या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. डी.टी. शिर्के यांची उपस्थिती असेल. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राचे समन्वयक डॉ. अवनीश पाटील, डॉ. नीलांबरी जगताप यांनी केले आहे.

 

Back to top button