‘पुणे प्लॉगेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 34 हजार किलो कचरा संकलित | पुढारी

‘पुणे प्लॉगेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 34 हजार किलो कचरा संकलित

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या वतीने आयोजित ‘पुणे प्लॉगेथॉन’ या मेगा ड्राइव्हमध्ये जवळपास दीड लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये जवळपास 34 हजार किलो कचरा संकलित करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात दीड लाख नागरिक, स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था, शाळा-महाविद्यालये यांनी सहभाग घेतला.

पुणे प्लॉगेथॉन 2022 मेगा ड्राइव्हची एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रमी नोंद करण्याचे उद्दिष्ट ठेवून महापालिकेकडून नोंदणी करण्यात आली होती. पालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण 134 रस्ते, विविध वारसास्थळे, शहरातील एकूण 45 उद्याने, टेकड्या, पुणे शहरातील विविध नदी घाट इत्यादी ठिकाणी प्लॉगेथॉन ड्राइव्ह राबविण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून करण्यात आली.

या वेळी कॉन्सुलेट जनरल ऑफ स्वीडन इन महाराष्ट्र अँड गोवा माना लुटविक, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह सर्व अधिकारीवर्ग उपस्थित होता. या संपूर्ण उपक्रमांतर्गत 29 हजार 870 किलो प्लास्टिक कचरा, 753 किलो ई-कचरा व 3 हजार 854 किलो इतर कचरा, असा एकूण 34 हजार 477 किलो कचरा संकलित करण्यात आला व सदर कचर्‍याचे पर्यावरणपूरकरित्या व्यवस्थापन करण्यात आल्याचे उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा 

उत्तराखंडमधील बस अपघातातील मृतांचा आकडा २६ वर

‘प्रदूषण नियंत्रण’ची महापालिकेला नोटीस; 70 नाल्यांच्या पाण्यावर काय प्रक्रिया केली ते सांगा

कोल्हापूर : मनपाचे आपत्ती व्यवस्थापन सज्ज

Back to top button