नाशिक : दादासाहेब फाळके स्मारक शहरवासीयांसाठी खुले होणार | पुढारी

नाशिक : दादासाहेब फाळके स्मारक शहरवासीयांसाठी खुले होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खासगीकरणाद्वारे फाळके स्मारकाचा विकास करण्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर आता स्मारक महापालिकाच विकसित करणार आहे. त्याद़ृष्टीने महापालिकेचे प्रयत्न सुरू झाले असून, त्याआधी शहरवासीयांसाठी स्मारक खुले करण्यात येणार आहे. तत्पूर्वी महापालिकेने फाळके स्मारकातील बंद पडलेले दोन कारंजे आणि धबधबा पूर्ववत सुरू केला आहे.

पीपीपी तत्त्वावर अर्थात खासगीकरणातून फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्याची योजना तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी राबविण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनपात झालेल्या आढावा बैठकीत स्मारक खासगीकरणातून विकसित करण्याची प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मनपा प्रशासनाने खासगीकरणाची निविदा प्रक्रिया रद्द करून स्वनिधीतूनच प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेतला. तसेच नागरिकांसाठी प्रकल्प खुला करण्याचे आदेश आयुक्तांनी यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार या प्रकल्पातील किरकोळ दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली असून, स्मारकातील कृत्रिम धबधबा आणि दोन कारंजे सुरू करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त पवार यांनी दिली. येत्या काही दिवसांत हा स्मारक खुले करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button