

वॉशिंग्टन; पुढारी ऑनलाईन
भारतीय अमेरिकन असलेली हरिणी लोगन (Indian American Harini Logan) हिने अमेरिकेतील स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी (Scripps National Spelling Bee) स्पर्धा जिंकली आहे. १४ वर्षीय हरिणीने स्पेल-ऑफमध्ये २२ शब्दांचे अचूक स्पेलिंग करून या स्पर्धेत बाजी मारली. तिला विजेतेपदासह ५० हजार डॉलर रोख बक्षीस आणि ट्रॉफी मिळाली आहे. स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी या स्पर्धेचे दरवर्षी अमेरिकेत आयोजन केले जाते.
हरिणी ही अमेरिकेतील सॅन अँटोनियो येथील रहिवाशी असून ती आठवीत शिकते. तिने अंतिम फेरीत सातवीत शिकणाऱ्या भारतीय वंशाच्या विक्रम राजू (वय १२) याला पराभूत केले. गेल्या वर्षी १४ वर्षांच्या झैला अवांत-गार्डेने स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली होती.
हरिणी लोगनने (Harini Logan) याआधीही स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेत भाग घेतला होता. पण ती टॉप ३० मध्ये स्थान मिळवण्यात अयशस्वी ठरली होती. तिने २०१८ मध्ये ३२३ वे स्थान मिळवले होते. २०१९ मध्ये ती ३०व्या स्थानावर तर २०२१ मध्ये तिला ३१ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये स्पेलिंग बी स्पर्धा रद्द करण्यात आली होती. हरिणीला पोहणे, अभिनय, टेनिस, लिहिणे आणि गाण्याची आवड आहे.
स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी ही एक अशी स्पर्धा आहे ज्यात प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत शिकणारे विद्यार्थी सहभागी होतात. या स्पर्धेत काही सेकंदात शब्दांचे स्पेलिंग सांगावे लागते. यावर्षी या स्पर्धेत २३४ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील १२ मुले अंतिम फेरीत पोहोचले होती.