नाशिक (सिडको) : अवघ्या काही तासांत दीड वर्षांच्या अपहरण केलेल्या मुलीची सुटका | पुढारी

नाशिक (सिडको) : अवघ्या काही तासांत दीड वर्षांच्या अपहरण केलेल्या मुलीची सुटका

नाशिक (सिडको) ; पुढारी वृत्तसेवा : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण केले. संबंधित संशयिताला पोलिसांनी सापळा रचत अटक करून अपहृत मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.

याबाबत सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी माहिती दिली की, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनिताकुमारी जितेंद्र भारती (२५,धंदा मजुरी,रा. बिल्डिंग नंबर 6 पाचवा मजला घर नंबर 511 चुंचाळे शिवार, घरकुल, अंबड, नाशिक) ह्या कामावर गेल्या असताना त्यांची मुलगी सुमिया जितेंद्र भारती ( वय १ वर्षे ६ महिने ) हिचे (दि.२९ ) संध्याकाळी ६ वाजेपुर्वी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून पोलिसांनी सदर अपहृत मुलीचा तपास सुरू केला. सपोनी गणेश शिंदे पोलीस शिपाई हेमंत आहेर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सदर मुलीचे अपहरण एका अज्ञात व्यक्तीने केले असल्याचे त्यांना समजले.

पोलीस पथकाने सापळा रचत संशयितांना अटक केली. आरोपीने ज्या ठिकाणी सदर दीड वर्षाच्या मुलीला ठेवले होते तेथून पोलिसांनी तिची सुखरूप सुटका करून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. सदर संशयिताने दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यामागे नेमके कारण काय? व त्याचे इतर साथीदार कोण आहेत? याचा आता पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी पुढील तपास वपोनी भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार करत आहेत.

हेही वाचा

Back to top button