Nashik : नाशिकच्या धर्मसभेत नेमकं काय घडलं? हनुमान जन्मस्थळावरून साधू-महंतांचा राडा | पुढारी

Nashik : नाशिकच्या धर्मसभेत नेमकं काय घडलं? हनुमान जन्मस्थळावरून साधू-महंतांचा राडा

नाशिकरोड ; पुढारी वृत्तसेवा : हनुमान जन्मस्थळ निश्चित करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या धर्मसभेत साधु मंहतांमध्ये चांगलाच राडा झाला. यावेळी शाब्दिक बाचाबाची अन प्रचंड गोंधळ उडाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. कोणत्याही मुददयावर एकमत झाले नाही. त्यामुळे धर्मसभा स्थगीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाशिकरोड येथील महर्षी पंचायतम सिध्दपीठम आश्रमात मंगळवारी (दि. ३१) सकाळी अकरा वाजता महंत अनिकेत शास्त्री यांनी हनुमानाचे जन्मस्थळ निश्चित करण्यासाठी धर्मसभेचे आयोजन केले होते. धर्मसभेत कर्नाटक येथील किशकिंदा येथे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा करणारे महंत गोविंदानंद सरस्वती त्याचप्रमाणे नाशिकातील त्रंबकेश्वर जवळील अंजनेरी पर्वतावर हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा करणारे साधु, महंत उपस्थित होते.

यामध्ये काळाराम मंदीराचे महंत सुधीरदास महाराज, पंडीत शांताराम शास्त्री भानोसे, भक्तीचरणदास महाराज श्री नाथानंद सरस्वती, सिध्देश्वर नंद महाराज, बबनगीरी महाराज, नाशिक पुरोहीत संघाचे अध्यक्ष शतीश शुक्ल, भालचंद्र शोचाई, रामचंद्र कळमकर, पंडीत तेजस्वी जोशी आदी उपस्थित होते. दोनीही गटाच्या साधु महंतानी आपआपली मते मांडली. पण यामध्ये एकमत होऊ शकले नाही. वाद, प्रतिवादात धर्मसभा कोणत्याही निर्णयाविना स्थगीत करण्यात आली.

धर्मसभेतील क्षणचित्रे

नाशिकचे महंत पुराव्यासह धर्मसभेत पोहचले, त्यावेळी किशकिंदा हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा करणारे गोविंदानंद सरस्वती महतांच्या सिहांसनावर बसलेले होते. तर नाशिकच्या महंतांना खाली बसण्याची व्यवस्था होती. त्यामुळे नाशिकचे महंत संतप्त झाले, त्यांनी गोविंदानंद सरस्वती यांना देखील आमच्याप्रमाणे खाली बसावे असा आग्रह धरला. मात्र गोविंदानंद यांनी मी खाली बसणार नाही अशी स्पष्ट भुमिका घेतली. त्यामुळे नाशिकच्या महंतांनी धर्मसभेवर बहिष्कार टाकला. धर्मसभा होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. पण गोविंदानंद सरस्वती यांनी काहीवेळाने मी देखील खाली बसतो, असे मान्य केले, त्यानंतर धर्मसभेला सुरुवात झाली. नाशिकच्या महंतांनी प्रमाणे, दाखले देत अंजनेरी हीच हनुमानाची जन्मभुमी असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयन्त केला. मात्र गोविंदानंद सरस्वती आपल्या भुमिकेवर ठाम राहीले. शेवटी नाशिकच्या महंतांचा संयम तुटल्याने वादविवादाला सुरुवात झाल्याने धर्मसभा स्थगीत करण्याचा निर्णय झाला.

महंत सुधीरदास यांनी उगारला माईक

धर्मसभेत एकमत होते नव्हते, वादविवाद सुरु होते. गोविंदानंद सरस्वती हे आपला परिचय देत होते. त्यावेळी त्यांनी द्वारकापीठ शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्याकडून आपण सन्यास घेतला, अशी माहीती दिली. त्यावेळी महंत सुधीरदास यांनी शंकराचार्य काँग्रेसला मानणारे आहेत. असे म्हटले. तोच मुद्दा पकडून गोविंदानंद यांनी तुम्ही शंकराचार्य यांचा अपमान केला. अगोदर माफी मागा, माफी मागत नाही तोपर्यंत मी नाशिक सोडणार नाही, अशी भुमिका घेतली. त्यामुळे सुधीरदास यांनी प्रसिध्दी माध्यमांचा माईक गोविंदानंद यांच्यावर उगारला. त्यामुळे धर्मसभेत एकच गोधळ उडाला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करीत गोविंदानंद सरस्वती यांना सुरक्षित धर्मसभेच्या बाहेर काढले. या गोंधळामुळे धर्मसभा स्थगीत करण्यात आली.
प्रतिक्रिया

धर्माचार्यांचा मी अवमान केला नाही. त्यामुळे मी माफी मागण्याचा काही प्रश्नच उदभवत नाही. खुपच वेळ आली तर मी धर्माचार्यांना व्यक्तीशा भेटून माफी मागेल. पण गोविंदनंद यांच्या समोर माफी मागणार नाही. -महंत सुधीरदास महाराज

वाल्मिकी रामायणात प्रमाण असल्याने हनुमानाचे जन्मस्थळ हे किशकिंदा हेच असण्यावर मी ठाम आहे. सुधीरदास यांनी शंकराचार्य यांना काँग्रेसचे असल्याचे संबोधून त्यांचा अवमान केला आहे. त्यांनी या प्रकाराबददल माफी मागायला हवी.
-गोविंदानंद सरस्वती

गोविंदानंद यांना तडीपार करा

हनुमान जन्मस्थळाबाबत वादग्रस्त विधान करणारे गोविंदानंद सरस्वती यांनी नाशिकचे वातावरण तणावपुर्ण केले आहे. त्यांना पोलिसांनी नाशिक जिल्हयाबाहेर काढावे, अशा मागणीचे निवेदन आम्ही पोलिसांना देणार असल्याची माहीती यावेळी उपस्थित महंतानी केली.

हेही वाचा

Back to top button