हार्दिकच्या कामगिरीमुळे ‘मुंबई’चे चाहते दु:खी झाले असतील : अजय जडेजा | पुढारी

हार्दिकच्या कामगिरीमुळे ‘मुंबई’चे चाहते दु:खी झाले असतील : अजय जडेजा

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : इंडियन्स प्रीमिअर लीग 2022 मध्ये हार्दिक पंड्याचा करिश्मा पाहून मुंबई इंडियन्सचे फॅन्स सर्वाधिक दुःखी झाले असतील, असे विधान माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याने केले आहे.

यंदाच्या आयपीएलमधून हार्दिक पंड्या एक दमदार कर्णधार म्हणून जगासमोर आला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने पदार्पणातच आयपीएल 2022 चे जेतेपद नावावर केले. अंतिम सामन्यात त्यांनी राजस्थान रॉयल्सवर 7 विकेटस् राखून विजय मिळवला. त्यामुळे हार्दिकच्या कामगिरीवर व विशेषतः नेतृत्व कौशल्यावर सुनील गावसकरपासून ते मायकल वॉनपर्यंत सारेच कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

आयपीएल 2021 पर्यंत हार्दिक हा मुंबई इंडियन्सचा सदस्य होता. परंतु आयपीएल 2022 मेगा ऑक्शनपूर्वी मुंबईने त्याला रिटेन केले नाही. त्याच्याएवजी केरॉन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह व रोहित शर्मा यांना रिटेन केले. हार्दिकची तंदुरुस्ती व फॉर्म यावरून मुंबई इंडियन्सने त्याच्या मॅच विनिंग कामगिरीवर शंका उपस्थित केली. पण, त्यानेच आज सर्व टीकाकारांना गप्प केले. अजय जडेजा म्हणाला, “हार्दिक पंड्याची कामगिरी पाहून प्रेक्षकांना अधिक प्रेरणा मिळाली असेल. त्याला चाहत्यांनी डोक्यावर उचलून घेतले. जर कोणाला दुःख झाले असेल, तर ते मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना. गुजरातच्या जेतेपदानंतर हे दुःख अजून वाढले असेल.”

रोहित, महेंद्रसिंग धोनी व गौतम गंभीर यांच्यानंतर हार्दिक हा आयपीएल जेतेपद पटकावणारा चौथा कर्णधार आहे. त्याने 2015, 2017, 2019 व 2020 साली मुंबई इंडियन्सचा खेळाडू म्हणून जेतेपदाचा चषक उंचावला होता अन् 2022 मध्ये त्याने कर्णधार म्हणून ही कामगिरी केली. रोहितच्या नावावर 5 जेतेपदे आहेत, किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू यांच्याही नावावर प्रत्येकी 5 जेतेपदे आहेत. महेंद्रसिंग धोनी व लसिथ मलिंगा यांनी प्रत्येकी 4 वेळा ही कामगिरी केली आहे.

जडेजा पुढे म्हणाला, “विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी व रोहित शर्मा या तिघांकडून हार्दिकने सर्वोत्तम तेच घेतले. अनुभव तुम्हाला नेहमी शिकवत असतो. मुंबई इंडियन्सकडून तो भरपूर शिकला. बडोदामधून तो आला, परंतु मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला घडवले. आज जो हार्दिक पाहतोय, तो मुंबई इंडियन्समुळे. त्याचे त्याने आभार मानायला हवे.”

Back to top button