मोहोळ : दोन दिवट्यांनी बापालाच लावला दोन लाखांचा चुना | पुढारी

मोहोळ : दोन दिवट्यांनी बापालाच लावला दोन लाखांचा चुना

मोहोळ; पुढारी वृत्तसेवा : दोन भावांनी संगणमताने आपल्याच वडिलांच्या एटीएम मधून तब्बल दोन लाख रुपये परस्पर काढून फसवण्याचा प्रकार ३१ मे रोजी उघडकीस आला. जगन्नाथ भुजंगा कोकरे (रा.गोटेवाडी, ता. मोहोळ) अशी फसवणूक झालेल्या पित्याचे तर सागर जगन्नाथ कोकरे, सचिन जगन्नाथ कोकरे (रा. गोटेवाडी) असे फसवणूक करणाऱ्या दिवट्या पुत्रांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जगन्नाथ भुजंगा कोकरे  (वय ५२ वर्षे, रा. गोटेवाडी, ता. मोहोळ) हे शेतकरी असून मोहोळ येथील भारतीय स्टेट बँकमध्ये त्यांचे बचत खाते आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी बँकेकडून एटीएम कार्ड घेतले असून त्याचा कधीही वापर केलेला नव्हता. त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम होती. ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता ते मोहोळ येथील भारतीय स्टेट बँकेत बचत खात्यावरील दोन लाख रुपये काढण्यासाठी गेले होते.

यावेळी बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्या खात्यावर केवळ ६४३ रुपये शिल्लक असल्याचे सांगितल्याने त्यांना धक्काच बसला. अधिक चौकशी केली असता, एटीएम कार्डचा वापर करून दोन लाख रुपये काढले गेले असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्यानंतर जगन्नाथ कोकरे यांना त्यांच्या दोन मुलांनी संगणमत करून परस्पर एटीएम कार्ड चालू करून त्याच्या आधारे एटीएम मधून वेळोवेळी दोन लाख रुपये काढून घेतले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या प्रकरणी जगन्नाथ कोकरे यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादी नुसार सागर जगन्नाथ कोकरे, सचिन जगन्नाथ कोकरे (रा. गोटेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉ. शरद ढावरे हे करीत आहेत.

 

हेही वाचा

Back to top button