नाशिक : आणखी पाच वर्षे येथेच राहा, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना भुजबळांची शाबासकी की आणखी काही? | पुढारी

नाशिक : आणखी पाच वर्षे येथेच राहा, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना भुजबळांची शाबासकी की आणखी काही?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेत आढावा घेताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून कामाचा लेखाजोखा मांडतानाचा उत्साह बघून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तुम्ही आणखी पाच वर्षे येथेच राहा, असे त्यांना सांगितले. पालकमंत्र्यांनी बोललेल्या शब्दांचा अर्थ काय, याबाबत वेगवेगळे अन्वयार्थ काढले जात आहेत. कोणत्याही अधिकार्‍यास एका ठिकाणी कमाल तीन वर्षे काम करता येते, असा नियम असताना ज्येष्ठ मंत्री असलेल्या भुजबळांनी असे का म्हणावे, हा चर्चेचा विषय ठरत आहे.

जिल्हा परिषदेत प्रशासकीय कारकीर्द सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांनी पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेत येऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी प्रत्येक विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागाने केलेल्या कामांची माहिती दिली. या कामकाजाबद्दल पालकमंत्री भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पत्रकार परिषदेतही त्यांनी जिल्ह्याला चांगले अधिकारी मिळाले असल्याचे सांगितले.
दरम्यान बैठक सुरू असताना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामीण भागातील प्लास्टिकचा कचरा कमी करण्याबाबतही काही नावीन्यपूर्ण योजना असल्याचे यावेळी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कामकाजाबाबत केलेल्या सादरीकरणानंतर तुम्ही एवढे काम करतात, हे माहीतच नव्हते, असे प्रशस्तिपत्रक पालकमंत्र्यांनी दिले. त्याचवेळी, तुम्ही पुढची पाच वर्षे येथेच कामकाज करावे, असेही ते यावेळी म्हणाले.

शाबासकी आहे की, आणखी काही, असा प्रश्न
सनदी अधिकारी जास्तीत जास्त तीन वर्षे एका ठिकाणी कामकाज करू शकतात, हे ना. भुजबळांना माहीत नाही, असे कसे म्हणता येईल? त्यामुळे भुजबळांच्या या म्हणण्याचा अर्थ काय असावा, याचा अन्वयार्थ काढण्याचे काम जिल्हा परिषदेत सुरू होते. ही चांगल्या कामाबाबतची शाबासकी आहे की, आणखी काही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा :

Back to top button