Lok Sabha Election 2024 : कन्हैया कुमार यांचा उत्तर पूर्व दिल्ली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी

Lok Sabha Election 2024 : कन्हैया कुमार यांचा उत्तर पूर्व दिल्ली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha Election 2024 : उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांनी सोमवारी (६ मे) रोड शो करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांसह दिल्लीचे मंत्री आणि आपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष गोपाल राय उपस्थित होते. कन्हैय्या कुमार यांच्याविरोधात भाजपने विद्यमान खासदार मनोज तिवारी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. कन्हैय्या कुमार यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यावर दिल्ली काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता.

इंडिया आघाडीच्या जागावाटपात दिल्लीतील ७ लोकसभा जागांपैकी ४ जागांवर आम आदमी पक्ष तर ३ जागांवर काँग्रेस निवडणूक लढवत आहे. यापैकी उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा जागा इंडिया आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आली. काँग्रेसने या जागेसाठी कन्हैय्या कुमारांना मैदानात उतरवायचे ठरवले. पक्षाच्या या निर्णयामुळे दिल्ली काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती. तसेच दिल्ली काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार मनोज तिवारी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात मनोज तिवारी विरुद्ध कन्हैय्या कुमार असा सामना रंगणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत या मतदारसंघातून मनोज तिवारी यांना ५३.९० टक्के मते मिळाली होती. तर कन्हैय्या कुमार यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक बिहारच्या बिगुसराय मतदारसंघातून लढवली होती. तेव्हा भाजपचे गिरीराज सिंह यांनी कन्हैय्याचा पराभव केला होता.

दिल्लीतील ७ लोकसभा जागांसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी राजधानीत प्रचाराला सुरुवात केली आहे. यादरम्यान दिल्ली लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांनी अर्ज दाखल केला.

Back to top button