घोड्यावर बसवता येते, तसे खाली खेचता येते : संजय पाटील यांची आ. बाबर यांच्यावर टीका | पुढारी

घोड्यावर बसवता येते, तसे खाली खेचता येते : संजय पाटील यांची आ. बाबर यांच्यावर टीका

मांजर्डे; पुढारी वृत्तसेवा : “आम्हाला एखाद्याला घोड्यावर बसवता येते, तसे त्याला खालीसुद्धा खेचता येते, हे लक्षात ठेवा, असे म्हणत खासदार संजय पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांना चांगलाच इशारा दिला.

हातनूर (ता. तासगाव) येथे आयोजिय एका कार्यक्रमात खानापूर -आटपाडी मतदारसंघातील आमदार बाबर विरोधक एकत्र आले होते. यानिमित्ताने खासदार पाटील यांनी आ. बाबर यांच्यावर जोरदार टीका केली.

खा. पाटील म्हणाले, खानापूर आटपाडी मतदारसंघात आगामी काळात परिवर्तनाची नांदी आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सर्वांची समजूत काढून अनिलभाऊंचे काम करायचे आहे, असे आम्ही सर्वांना सांगितले होते. मात्र त्यांनीच अडचणी निर्माण केल्या. एखाद्याला जसे घोड्यावर बसवता येते, तसे त्यांना खालीसुद्धा खेचू शकतो. यावेळी आटपाडीच्या देशमुख घराण्याचे त्यांनी कौतुक केले. पराभवाने खचून जाणारे देशमुख कुटुंबीय नाही, असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना माजी जि. प. अध्यक्ष अमरसिंह देशमुख म्हणाले, खानापूर- आटपाडी मतदारसंघात उद्याचा आमदार वेगळा असणार आहे, हे मी ठामपणे सांगतो. मागील निवडणुकीच्या पराभवाबाबत खासदारांच्या उपस्थितीत लवकरच आम्ही सत्य बाहेर काढू.
माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील यांनीसुद्धा जोरदार टीका केली. कार्यक्रमास स्वाभिमानाचे महेश खराडे, माजी समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे, विलास पाटील, अमोल पाटील, सुदीप खराडे, सचिन पाटील उपस्थित होते.

वैभव पाटील यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण

खासदार संजय पाटील माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील यांच्याकडे पाहून म्हणाले,“वैभव पाटील घोड्यावर बसायला सज्ज व्हा, लवकर निर्णय घ्या आणि आमच्या बाजूला या”, असे म्हणत त्यांना भाजप प्रवेशाचे अप्रत्यक्षपणे निमंत्रण दिले. वैभव पाटील यांनी खा. पाटील यांच्याकडे पाहून मिस्किलपणे हास्य केले. निमंत्रण स्वीकारून वैभव पाटील राष्ट्रवादी सोडणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Back to top button