Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टी सपाट, PSU Bank स्टॉक्सचा मूड बिघडला, नेमकं काय घडलं? | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टी सपाट, PSU Bank स्टॉक्सचा मूड बिघडला, नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात सोमवारी (दि.६) चढ-उतार दिसून आला. बाजारात आज काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंगही दिसून आले. अमेरिका आणि युरोपीय बाजारातून मजबूत संकेत आणि बहुतांश आशियाई बाजारांतील संमिश्र ट्रेंड दरम्यान देशांतर्गत बाजाराने तेजीत सुरुवात केली होती. पण सेन्सेक्स (Sensex), निफ्टी (Nifty) सपाट पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स १७ अंकांच्या किरकोळ वाढीसह ७३,८९५ वर बंद झाला. तर निफ्टी ३३ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २२,४४२ वर स्थिरावला.

क्षेत्रीयमध्ये निफ्टी पीएसयू बँक ३.६६ टक्क्यांनी घसरला. त्यानंतर निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स आणि निफ्टी ऑइल अँड गॅस अनुक्रमे २.५५ टक्के आणि १.७५ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप ०.९ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप १ टक्क्यांनी घसरला.

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्सवर कोटक बँक, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, सन फार्मा, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर टायटनचा शेअर्स तब्बल ७ टक्क्यांनी घसरून ३,२८४ रुपयांवर आला. एसबीआय, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, एलटी, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स हे शेअर्स घसरले.

sensex closing
sensex closing

निफ्टीवर ब्रिटानिया, कोटक बँक, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एम अँड एम हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर टायटन, अदानी एंटरप्रायजेस, बीपीसीएल, कोल इंडिया, एसबीआय हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले.

Nifty 50
Nifty 50

क्षेत्रीय पातळीवर निफ्टी आयटी निर्देशांक आज आघाडीवर राहिला. निफ्टी आयटीमध्ये टीसीएस, LTIMindtree, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस हे शेअर्स तेजीत होते.

PSU बँकिंग शेअर्सचा मूड बिघडला, कारण काय?

निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक आज सुमारे ४ टक्क्यांनी घसरून ७,२०२ पर्यंत खाली आला. पीएसयू बँकमध्ये (PSU bank stocks) पीएनबी, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया हे शेअर्स टॉप लूजर्स होते. पीएनबीचा शेअर्स तब्बल ६ टक्क्यांनी घसरून १२६ रुपयांवर आला. नवीन आरबीआयच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे PSU बँकिंग शेअर्सचा मूड बिघडला असल्याचे विश्लेषक सांगतात. आरबीआयने एक मसुदा परिपत्रक तयार केला आहे ज्यामध्ये प्रकल्प वित्तपुरवठा करण्याबाबतचे नियम कडक करण्यात आले आहेत. एखाद्या प्रकल्पाला वित्तपुरवठा करण्यापूर्वी, PSU बँकेला बांधकाम कालावधीत थकबाकीच्या ५ टक्के रकमेची तरतूद करावी लागेल. यामुळे PSU बँक शेअर्सवर दबाव राहिला.

पेटीएमचे शेअर्स घसरले

Paytm चालवणाऱ्या One 97 Communications चे शेअर्स आज ५ टक्क्यांनी घसरून ३५१.७० रुपयांच्या निचांकी पातळीवर आले. या कंपनीने पेटीएमचे सीओओ आणि अध्यक्ष भावेश गुप्ता यांच्या राजीनाम्याची माहिती एक्सचेंजला दिल्यानंतर Paytm कंपनीचे शेअर्स घसरले आहेत.

कोटकचा शेअर्स वधारला, टाटा टेक्नोलॉजीसमध्ये घसरण

कोटक महिंद्रा बँकेचा शेअर्स (Shares of Kotak Mahindra Bank) बीएसईवर ५ टक्क्यांनी वाढून १,६२७ रुपयांपर्यंत पोहोचला. दरम्यान, टाटा टेक्नोलॉजीसचा (Tata Technologies) चे शेअर्स BSE वर सुमारे ५ टक्क्यांनी घसरून १,०३२ रुपयांवर आला. दुपारच्या व्यवहारात या शेअर्सची घसरण काही प्रमाणात कमी झाली होती. ब्रोकरेजनी त्यांच्या शेअरची टार्गेट प्राइस कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर टाटा टेक्नोलॉजीसचा शेअर्स खाली आला.

 हे ही वाचा :

 

Back to top button