नाशिक : आता प्रवाशांना मिळणार सिटीलिंकचा कंट्रोल रूम पाहण्याची संधी | पुढारी

नाशिक : आता प्रवाशांना मिळणार सिटीलिंकचा कंट्रोल रूम पाहण्याची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपाच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंकच्या माध्यमातून प्रवाशांना अद्ययावत अशी सेवा दिली जाते. सिटीलिंकचे हे अद्ययावत कामकाज हे कंट्रोल रूमच्या माध्यमातून चालते. हेच कामकाज कशा पद्धतीने चालते हे पाहण्याची संधी प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली असून, प्रवाशांना दर शनिवारी 11 ते 12 यावेळेत कंट्रोल रूम खुली असेल.

सिटीलिंकमार्फत एका क्लिकवर तिकीट बुक करणे, ऑनलाइन पासेस काढणे, पासेस अद्ययावत करणे, प्रवास मार्ग आपल्या मोबाइल अ‍ॅपवर बघणे, बसेसचे मार्ग अशा सर्व प्रकारची माहिती प्रवाशांना मिळण्याची सुविधा सिटीलिंकने करून दिली आहे. यामुळे प्रवाशांनादेखील सिटीलिंकचे कामकाज कसे चालते याबाबत उत्सुकता असते. त्यामुळेच आता नाशिक महानगर परिवहन महामंडळाने दर शनिवारी आपली कंट्रोल रूम बघण्याची व कामकाज पाहण्याची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे. बसेसचे परिचालन कसे चालते, सिटीलिंक आपल्या बससेवेवर कसे नियंत्रण ठेवते, बसेस कोणत्या थांब्यावर थांबतात, बसेसने कोणत्या मार्गवरून किती वाजता फेरी सुरू केली, केव्हा बसफेरी संपली, जीपीएस यंत्रणा कशी कार्य करते, अशी सर्व माहिती प्रवाशांना जाणून घेता येणार आहे. एकावेळी केवळ 10 व्यक्तींनाच या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. इच्छुक प्रवाशांनी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेतच 8793999860 या क्रमांकावरून भेटीची तारीख निश्चित करता येईल.

हेही वाचा :

Back to top button