दर कमी न करताच केवळ श्रेयाचे नाटक | पुढारी

दर कमी न करताच केवळ श्रेयाचे नाटक

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : केंद्राने ऑईल कंपन्यांना स्वायत्ततेचा अधिकार दिल्याने या कंपन्या सोन्या-चांदीप्रमाणेच कच्च्या तेलाच्या दरानुसार दररोज दरात बदल करत आहेत. यामुळे इंधन दरवाढीने नवा उच्चांक गाठला. अलीकडे केंद्राने दरात कपात केली. अशात राज्य सरकारने दर कमी न करताच श्रेयाचे नाटक सुरू केल्याने पंपचालकांसह वाहनचालक वैतागले आहेत.

पूर्वी ऑईल कंपन्यांना रुपयात नव्हे तर पैशात दरवाढ करताना किंवा दर कमी करताना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागत होती. तीन वर्षांपूर्वी सरकारने यात बदल करत ऑईल कंपन्यांवरील नियंत्रण उठविले आणि त्यांना स्वायत्ततेचा अधिकार दिला. यामुळे दरवाढ आणि कपात करण्यास त्या कंपन्यांना मोकळीकता मिळाली. या स्वायत्ततेच्या अधिकाराचा गैरफायदा घेत ऑईल डिलर असोसिएशनच्या मागण्या, सूचना आणि त्यांच्या तक्रारीही जाणून घेईना किंवा त्यांना किंमतही देईना. यामुळे पेट्रोल डिलर असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. आता तर कच्च्या तेलाच्या दराप्रमाणेच रोजच इंधन दरवाढ करण्यात येत आहे. याचा थेट फटका वाहनचालकांना बसत आहे. अशात केंद्र सरकारही बघ्याची भूमिका घेत राहिल्याने कंपन्यांची चांगलीच चांदी होत आहे.

21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. तो दर लागूही करण्यात आला. अशात राज्य सरकारनेही दर कमी करण्याचे जाहीर करत वाहनचालकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरामध्ये कपात काही केली नाही. केंद्राने दर कमी केल्यास राज्यातील दरही आपोआपच कमी होतात. राज्याने स्वतंत्र दर कमी केले असते तर करामध्ये कपात होऊन दरही कमी झाले असते. तसे झाले नसल्याचा मुद्दा पेट्रोल पंपचालक पुढे करत आहेत.

पंपचालकांचा इशारा : 31 मे रोजी ‘नो परचेस’

गत तीन वर्षांपासून रोजच पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या तुलनेत पेट्रोल पंपचालकांच्या कमिशनमध्ये वाढ झालीच नाही. 50 रुपये दर असल्यापासून आहे तेच कमिशन आहे. लिटरमागे पेट्रोलला 2.80 रुपये, तर डिझेलला 1.80 रुपये असा दर आहे. अशात ऑईल कंपन्या पंपचालकांना विश्वात घेत नाही. केंद्र सरकारही दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ 31 मे रोजी पेट्रोल पंप असोसिएशनने ‘नो परचेस’ आंदोलन करणार आहेत. इंधन खरेदी करणार नाही, पण वाहचालकांना इंधन पुरवठा करणार आहे. पंपचालकांना संप करता येत नसल्याने त्यांनी केंद्र सरकारला आठवण करुन देण्यासाठी ही भूमिका घेतली आहे.

आतापर्यंत दरात झालेली कपात

केंद्र सरकारने 21 मे रोजी घोषणा करत पेट्रोलसाठी प्रति लिटर 8, तर डिझेलवर 6 रुपये एक्साईज ड्युटी कमी केली. यामुळे प्रत्यक्षात पेट्रोल 9.9, तर डिजल 7.31 रुपयांनी स्वस्त झाले. यापूर्वी दिवाळीच्या काळात 4 नोव्हेंबर 2021 रोजीही पेट्रोलच्या दरात 5.82, तर डिझेलच्या दरामध्ये 12.17 रुपयांनी कमी केले होते. आता दरात केलेल्या कपातीमुळे थोडा दिलासा मिळाला आहे. वाढीच्या तुलनेत कमी केलेले दर तुल्यबळच आहे. याचाही मनस्ताप नागरिकांना होत आहे.

ऑईल कंपन्या व केंद्र सरकार पंपचालकांच्या अडचणी समजून घेत नाहीत. दरवाढ होऊनही कमिशन काही वाढले नाही. अनेक अडचणी आहेत. याचा निषेध करण्यासाठी 31 मे रोजी ‘नो परचेस’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
– महेंद्र लोकरे,
सचिव, सोलापूर जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशन

पेट्रोल, गॅस, अन्नधान्यासह सगळ्या गरजेच्या वस्तूंच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. यासाठी शासनाने दर नियंत्रणात आणत दिलासा द्यावा, हीच अपेक्षा. अन्यथा नागरिकांना मनस्पात होईल.
-मल्लिनाथ करपे,
यावसायिक, अक्कलकोट

Back to top button