नाशिक : शाळा-कॉलेजेस सुरू झाल्यानंतर सिटीलिंक बसेसची संख्या वाढविणार | पुढारी

नाशिक : शाळा-कॉलेजेस सुरू झाल्यानंतर सिटीलिंक बसेसची संख्या वाढविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून शाळा-कॉलेजेस सुरू होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या सिटीलिंकने पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, सिटीलिंकच्या ताफ्यात 30 बसेस सुरू करण्यात येणार आहेत. तसेच नवीन 10 मार्गांवर बससेवा सुरू करण्यात येणार आहेत. नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शहर बससेवेत 30 बसेस दाखल होणार असल्याने सिटीबसची संख्या 230 वर पोहोचणार आहे. सध्या 50 मार्गांवर बसेस धावत आहेत. मंगळवारी (दि. 24) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत महामंडळाच्या अध्यक्षपदावर मनपा आयुक्त रमेश पवार यांची निवड करण्यात आली. सिटीलिंक बससेवेचा लाभ प्रतिदिन सुमारे 67 हजार नागरिक घेत असून, 20 लाख इतके उत्पन्न महिन्याला मिळत आहे. त्यामुळे सिटीबसचा विस्तार करण्याबाबत नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. कंपनीची बैठक आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात कंपनीच्या अध्यक्षपदी तसेच व्यवस्थापकीय संचालक या दोन पदांवर पवार यांची निवड करण्यात आली. जूनपासून शाळा व कॉलेजेस सुरू होणार असल्याने शहर बसेसची संख्या 250 बसेसपर्यंत वाढविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 30 बसेस जूनपासून सुरू होतील. बैठकीला संचालक शिवाजी चव्हाणके, बोधीकिरण सोनकांबळे, नरेंद्र महाजन, विभाग नियंत्रक मुकुंद कुवर, बाजीराव माळी, व्यवस्थापक मिलिंद बंड, गायधनी आदी उपस्थित होते.

फुकट्या प्रवाशांना दंड – ‘एनएमपीएमएल’साठी पूर्णवेळ मुख्य लेखापाल मिळाला आहे. चंद्रपूर येथील कोशागार अधिकारी प्रीती खारतुडे यांची लेखापालपदी नियुक्ती करण्यात आली. विनातिकीट प्रवास करणार्‍या 781 प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिलिंद बंड यांनी दिली. अशा प्रवाशांकडून तीन लाख 98 हजारांचा दंड वसूल करण्यात आला असून, तिकीट न देता पैसे घेणार्‍या 61 वाहकांना बडतर्फ करण्यात आले आहे. अशा वाहकांकडून चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button