पिंपरी : दहशतवादी हल्ल्यांचा सामना करणार कसा? | पुढारी

पिंपरी : दहशतवादी हल्ल्यांचा सामना करणार कसा?

संतोष शिंदे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी येथून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. यापूर्वी देखील कासारवाडी, कुदळवाडी या भागातून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘पुढारी’ने पोलिसांच्या तयारीचा आढावा घेतला असता शहरात दहशतवादी हल्ल्यात महत्वाची भूमिका बजावणारे फोर्स वन, क्यूआरटी, बॉम्ब शोधक आणि श्वान पथक कार्यरत नसल्याचे समोर आले. म्हणजेच भविष्यात शहरावर एखादा दहशतवादी हल्ला झाला तर पिंपरी- चिंचवडकरांना पुणे शहर पोलिसांकडून येणार्‍या मदतीची वाट पाहावी लागणार आहे.

यामध्ये शहरवासियांचा तब्बल एक ते दीड तास जीव टांगणीला लागणार आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी- चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. मात्र, आयुक्तालय सुरू करतेवेळी काही महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे. कोणतीही पूर्व तयारी न करता पुणे शहर पोलिसांच्या अखत्यारीत असलेली 9, पुणे ग्रामीण हद्दीतील 5 आणि 1 नवीन पोलीस ठाणे अशी 15 पोलीस ठाणी घेऊन पिंपरी- चिंचवडचा स्वतंत्र कारभार सुरू करण्यात आला. यामध्ये शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची असलेली पथके अद्यापही सुरू करण्यात आली नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दहशतवादी हल्ल्याचा सामना करणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘क्यूआरटी’ अडकले लाल फितीत

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात ‘क्यूआरटी’ म्हणजेच शीघ्र कृती दलाची भूमिका अतिशय महत्वाची असते. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ‘क्यूआरटी’ च्या जवानांनी आपले कर्तव्य चोख बजावले होते. पिंपरी-चिंचवड शहरासाठी देखील ‘क्यूआरटी’ च्या तीन तुकड्या प्रस्तावित आहेत. त्यासाठी मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामग्रीची मागणी देखील करण्यात आली होती. मात्र, महासंचालक कार्यालयाकडून नुकतेच फेर प्रस्ताव मागवण्यात आल्याने ‘क्यूआरटी’ लाल फितीच्या कारभारात अडकल्याचे बोलले जात आहे.

… तर मोठी अडचण

दहशतवादी हल्ल्या दरम्यान बॉम्ब शोधक / नाशक आणि श्वान पथकाची मोठी आवश्यकता असते. पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात ही पथके नसल्याने मोठ्या अडचणी येत आहेत. काही दिवसांपुर्वी दिघी येथे डुक्कर बॉम्ब आढळले होते. त्यावेळी पुण्यातून मदत येण्यासाठी तब्बल दोन तास वाट पाहावी लागली. तोपर्यंत स्थानिक पोलिसांना परिस्थिती हाताळताना तारेवरची कसरत करावी लागली. भविष्यात पुणे आणि पिंपरी- चिंचवडला जर एकाच वेळी या पथकांची आवश्यकता भासल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

‘फोर्स वन’ची गरज

मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यानंतर अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘फोर्स वन’ या पथकाची निर्मिती केली. राज्यातील महत्वाच्या मानल्या जाणार्‍या दहा ठिकाणी हे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. हिंजवडी, तळवडे येथील आयटी पार्कमुळे पिंपरी- चिंचवड शहर जगाच्या नकाशावर झळकत आहे. त्यामुळे पिंपरी- चिंचवड शहरातही ‘फोर्स वन’ पथक असणे गरजेचे आहे.

दहशतवाद्यांचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन

तपास यंत्रणांनी शहर परिसरातून यापूर्वी दहशतवादी, माओवादी संघटनांचे सदस्य, खलिस्तानवादी, जमियत-उल-मुजाहिद्दीनचे सदस्य आणि नक्षलवाद्यांना अटक केली आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींचे कासारवाडी येथे वास्तव्य असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच, माओवादी चळवळीतील एका कमांडरला तळेगाव दाभाडे येथून अटक करण्यात आली होती.

तीस वर्षांपासून तो तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. त्यानंतर बिहार एटीएसने बांगलादेशातील बंदी घालण्यात आलेल्या जमीयत-उल-मुजाहिद्दीनच्या संपर्कात असणार्‍या एकाला चाकण येथून अटक केली होती. कुख्यात संशयित दहशतवादी रियाझ आणि यासिन भटकळ या बंधूनी कुदळवाडी येथे भेट दिल्याचे उघड झाले आहे. मुंबई बॉम्बस्फोटानंतर एटीएसने कुदळवाडी परिसर पिंजून काढला होता.

पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून बॉम्ब शोधक/ नाशक पथक, शीघ्र कृती दल आणि तीन प्रकारच्या स्वतंत्र श्वान पथकांची यापूर्वीच मागणी करण्यात आली होती. मात्र, दरम्यान, महासंचालक कार्यालयाकडून फेर प्रस्ताव मागितला आहे. त्यानुसार, नव्याने प्रस्ताव देण्याचे काम सुरू आहे. लवकरच ही पथके सुरू होतील.

– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, प्रशासन, पिंपरी- चिंचवड.

हेही वाचा

Back to top button