वरातीतल्या भांडणातून युवकाचा खुन; मृतदेह चासकमान कालव्यात फेकला | पुढारी

वरातीतल्या भांडणातून युवकाचा खुन; मृतदेह चासकमान कालव्यात फेकला

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा

लग्नाच्या वरातीत दारू पिऊन भांडणे केल्याच्या वादातून युवकाचा खुन झाला. सहा युवकांनी मारहाण केल्यानंतर मयत युवकाला जीवे मारण्याच्या हेतुने चासकमान डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकुन दिले. शंकर शांताराम नाईकडे (वय ४०, रा. कडधे, ता. खेड) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी काही गंभीर गुन्हे दाखल आहेत. अवैध व्यवसाय केल्यावरून हे गुन्हे दाखल आहेत.

बुधवारी (दि २५) रात्री साडेबारा नंतर घडलेल्या या घटनेतील मयताच्या शोधासाठी कालव्याचे पाणी बंद करण्याची विनंती कालवा प्रशासनाला केली आहे, अशी माहिती खेडचे पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांनी घटनास्थळावरून दिली. वासुदेव बोंबले, पवन बोंबले (दोघेही रा. वेताळे, ता. खेड) व स्वप्नील सावंत, निलेश नाईकडे, ऋषिकेश उर्फ लखन नाईकडे, विलास परसुडे (सर्व रा. कडधे, ता. खेड) यांच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या पत्नी सुषमा शंकर नाईकडे यांनी तक्रार नोंदवली आहे

कडधे गावात मंगळवारी (दि. २४) एका लग्नाची वरात रात्री सुरू होती. त्यात शंकर नाईकडे आला व त्याने काही युवकांकडे प्यायला दारूची मागणी केली. नंतर नाचणाऱ्या काही युवकांमध्ये घुसुन धक्काबुक्की करू लागला. त्यावर बाचाबाची, भांडणे होऊन त्याला लगेचच मारामारीचे स्वरूप आले. मयत शंकर याला गुन्ह्याची पार्श्वभूमी असल्याने गाव परिसरात दहशत होती.

अधिक काही घडण्याअगोदार ठराविक युवकांनी एकत्रितपणे त्याला बाजूला नेले. अंधारात त्याच्यावर चहुबाजूंनी जोरदार हल्ला चढवला. दगड-विटांनी डोक्यावर मारहाण केली. त्यात तो निपचित पडला. भविष्यात त्रास होऊ शकतो म्हणून त्याला एका वाहनात घालुन गावाच्या बाहेरून वाहणाऱ्या कालव्याच्या पाण्यात फेकुन दिला, अशी हकीकत ग्रामस्थांनी सांगितली.

Back to top button