नाशिक : अरे, चांगला व्हयना रस्सा, घे थोडा पेवाले… | पुढारी

नाशिक : अरे, चांगला व्हयना रस्सा, घे थोडा पेवाले...

नाशिक (मालेगाव) : दिनेश बोरसे
उत्तर महाराष्ट्रातील प्रतिजेजुरी म्हणून प्रसिद्ध तसेच माता बानाईचे माहेर असलेल्या श्रीक्षेत्र चंदनपुरीत सध्या दर रविवारी दिवट्या-बुधल्या कार्यक्रमांनिमित्त सामिष भोजनाच्या पंगती उठत आहेत.

सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरू आहे. लग्न म्हटले की, धार्मिक विधींची रेलचेल असते. लग्न ठरले की, सर्वात आधी लग्नाघरी दिवट्या-बुधल्या केल्या जातात.घरातील मोठ्या किंवा लहान मुलाच्या लग्नात रीत-परंपरेनुसार दिवट्या-बुधल्या करण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे. दिवट्या-बुधल्या म्हणजे श्री खंडोबा देवाची साग्रसंगीत पूजाविधी होय. यामध्ये विशेषत: बोकड किंवा कोंबड्याच्या मटणाचे जेवण दिले जाते. त्यातील बोकड संख्या आणि उठलेल्या पंगती हा चर्चा आणि प्रतीक्षेचाही विषय ठरतो. काही ठिकाणी गोड जेवणही दिले जाते. पूर्वी दिवट्या-बुधल्या लग्नघरी सायंकाळच्या वेळी केल्या जायच्या. आजही ही परंपरा ग्रामीण भागात काही प्रमाणात टिकून आहे. परंतु, सध्याच्या धावपळीच्या जगात अनेकांना घरी हा कार्यक्रम करणे शक्य होत नाही. तेव्हा सहकुटुंब आणि आप्तांसमवेत थेट चंदनपुरी गाठून दुपारी दिवट्या-बुधल्या करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यातून एक रोजगाराचे साधन उपलब्ध होऊन स्थानिक पातळीवर व्यवस्थाही निर्माण होत आहे. त्यामुळे रविवारच्या दिवशी चंदनपुरीला यात्रेचे स्वरूप येते. सकाळपासूनच किंबहूना रात्री किंवा पहाटेपासूनच जागा मिळविण्यासाठी तेथे उपस्थित राहावे लागते. ग्रामपंचायत तसेच काही खासगी मंडळी या दिवट्या-बुधल्यांसाठी काही शुल्क आकारून जागा उपलब्ध करून देतात. त्यामुळे येथे पाणी, खाटीक, वाघ्या-मुरळी यासंबंधी इतर वस्तूंना महत्त्व आले आहे. बहुतेक कुटुंंबे साहित्य घेऊनच या ठिकाणी स्वयंपाक करतात. जेवणावळींच्या पंगती उठतात. या जेवणाची चव न्यारीच असते. तेव्हा अहिराणी भाषेत ‘अरे, रस्सा चांगला व्हयेल शे, घे थोडा पेवाले…’ असे आग्रही संभाषण हमखास ऐकायला मिळतात.

वाघ्या मुरळींची चांदी – चंदनपुरी येथे दिवट्या-बुधल्यांसाठी वाघ्या-मुरळींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे ते ही संधी साधतात. मंदिरात तळी भरण्यासाठी 51 ते 201 रुपये घेतले जातात. तसेच कार्यक्रमस्थळी दिवट्या-बुधल्या करण्यासाठी 1100 ते 2100 रुपयांची मागणी होते. त्यात जर लंगर तोडण्याचा कार्यक्रम असला, तर 3100 रुपये आकारले जातात.

हेही वाचा:

Back to top button