[author title="डॅनियल काळे" image="http://"][/author]
कोल्हापूर, डॅनियल काळे : शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी खानविलकर पेट्रोल पंपाच्या मागील बाजूपासून कसबा बावडा श्री राम पेट्रोल पंपापर्यंत नदीकाठाने जाणार्या प्रस्तावित 100 फुटी रस्त्याला ब्ल्यू लाईनचा अडथळा आला आहे. मार्केट यार्ड-जाधववाडी ते शुगर मिल या रस्त्यालाही हाच अडथळा आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे मार्गदर्शन महापालिकेने मागितले होते. शासनाने भूसंपादन करून घ्या,अशा सूचना दिल्या आहेत; परंतु भूसंपादनही रखडले आहे.
शहराभोवती रिंगरोडचे जाळे निर्माण करण्याची संकल्पना पुढे आली. दुसर्या सुधारित विकास योजनेत तशा प्रकारे प्रस्तावित रस्त्यांचे नियोजन केले. यामध्ये खानविलकर पेट्रोल पंपाच्या मागून कसबा बावड्यापर्यंत साडेपाच किलोमीटरचा रिंगरोड प्रस्तावित केला. भूसंपादनही सुरू झाले. तीच परिस्थिती मार्केट यार्ड ते शुगर मिल रस्त्याची झाली. हा रस्ता 18 मीटरचा प्रस्तावित आहे. 2019 आणि 2021 मध्ये शहरात महापूर आला. त्यानंतर ब्ल्यू लाईन निश्चित झाली.
या ब्ल्यू लाईनचा अडथळा या दोन रस्त्यांना आहे. कसबा बावड्याला राजाराम कारखान्याकडे होणारी ऊस वाहतूक गर्दीच्या रस्त्यावरून होते. त्यासाठी खानविलकर पंप ते कसबा बावडा हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. अडथळ्यासंदर्भात महापालिकेने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यासाठी प्रधान सचिवांनी संयुक्त बैठकही घेतली. भूसंपादन सुरू ठेवा. रस्ते कोणत्या पद्धतीने करायचे, हे ठरवून दिले जाईल. राष्ट्रीय हरित लवादाची परवानगी घेऊन आणि जलसंपदाच्या नियमावलीप्रमाणे रस्ते करता येणे शक्य आहे; परंतु महापालिकेने भूसंपादनाची प्रक्रिया अर्धवट अवस्थेत सोडून दिली, तर या रस्त्यांचा पाठपुरावाही केला नाही.
नदी वहन क्षेत्रात अडथळा नको
नदीच्या वहन क्षेत्रात कोणताही अडथळा न ठेवताही रस्ते करता येतात. याची अनेक उदाहरणे आहेत. शिरोली ते उचगावदरम्यान महामार्गावर पिलर उभारून रस्ता होणार आहे. त्याचा नदीच्या प्रवाहाला कोणताही अडथळा होणार नाही. नवतंत्रज्ञान वापरून असे रस्ते होत आहेत. त्यामुळे बावड्याकडे जाणारा शंभर फुटी रस्ता याच पद्धतीने किंवा जमीन पातळीवर करता येणे शक्य आहे. त्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद व जलसंपदा विभागाची परवानगी आवश्यक आहे.