दूध व्यवसाय तोट्यात गेल्याने शेतकरी घायकुतीला | पुढारी

दूध व्यवसाय तोट्यात गेल्याने शेतकरी घायकुतीला

जीवन कड

सासवड : दुधाला मिळत असलेल्या 35 रुपयांपर्यंतच्या चांगल्या बाजारभावामुळे शेतकर्‍यांनी कर्ज काढून जनावरे खरेदी केली, गोठे बांधले. परंतु, आता दुधाचे भाव गडगडल्याने दूध व्यवसाय तोट्यात आला आहे. दररोज तोटा सहन करीत कधीतरी दर वाढतील, या अपेक्षेवर शेतकरी तग धरून आहेत. नायगावचे शेतकरी प्रा. दत्तात्रय कड यांनी सांगितले की, माझ्याकडे 5 दुभती जनावरे असून, त्यातील 3 गायी दूध देतात. गेल्या 15 दिवसांपासून हिरवा चारा पूर्णपणे संपला असून, दुधाचे उत्पादन 40 लिटरवरून 25 लिटरवर आले आहे.

जनावरांचा दररोजचा फक्त चार्‍याचा व पशुखाद्याचा खर्च 900 रुपये होतो, तर दुधाचे उत्पन्न 750 रुपये मिळते. पशुखाद्यांची पिशवी 1260 रुपयांना झाली आहे. एक महिना पुरेल एवढाच ऊस आहे. वैरणही संपलेली आहे. बाहेरून चार्‍यासाठी ऊस प्रतिटन चार हजार रुपये, तर वैरण शेकडा चार ते साडेचार हजार रुपये एवढी किंमत आताच असून, आणखी महाग होण्याची शक्यता आहे. साकुर्डे येथील शेतकरी श्रीकांत सस्ते यांनी सांगितले की, सध्या 7 पैकी 2 दुभती जनावरे आहेत. दररोज 30 लिटर दूध मिळते. त्याचे 35 रुपयांनी 1 हजार 200 रुपयांपर्यंत पैसे मिळतात.

गोळीपेंडची बॅग 1450 रुपयांना, तर चांगल्या प्रतीच्या शेंगदाणा पेंडीचा भाव प्रतिकिलो 40 ते 42 रुपयांपर्यंत झाला आहे. दुधाचा 37 रुपयांवरून आता 34 ते 35 पर्यंत दर आला आहे. सध्या दूध कमी पडले असून आणखी दोन गायी खरेदी करणार आहे. घरचा हिरवा चारा, मुरघास आणि वैरण मुबलक असल्याने हा व्यवसाय मला परवडत आहे. बाजारभाव 35 रुपयांच्या खाली गेल्यावर सर्वसामान्य शेतकर्‍यांना हा व्यवसाय परवडणारा नाही. इंधन दरवाढीच्या झळाही शेतकर्‍यांना सोसाव्या लागत असून, शासनाने शेतकर्‍यांना ठाम दर देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button