कोल्हापूर : गाळेधारकांच्या 50 कोटी थकबाकी वसुलीचे आव्हान | पुढारी

कोल्हापूर : गाळेधारकांच्या 50 कोटी थकबाकी वसुलीचे आव्हान

सतीश सरीकर

कोल्हापूर : शहरातील दुकानगाळेधारकांकडे महापालिकेची कोट्यवधीची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने सवलत योजना सुरू केली आहे. 14 मार्चपासून आजअखेर केवळ 5 कोटी 86 लाख रुपये जमा झाले आहेत. परिणामी योजनेला दुकानगाळेधारकांकडून ठंडा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे थकबाकी वसूल करायची कशी, असा प्रश्न अधिकार्‍यांना पडला आहे. तसेच 50 कोटी थकबाकी वसूल करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.

सन 1990 मध्ये सभागृहात ठरलेल्या धोरणानुसार प्रशासनाने 3 वर्षे भाडेकराराने दुकानगाळे दिले आहेत. त्यानुसार गाळेधारक भाडे भरत होते. कालातंराने अनेकांचे करार संपले. नवीन करार करण्यात आले. 2015 मध्ये निम्म्यापेक्षा जास्त गाळेधारकांचे करार संपुष्टात आले आहेत. उत्पन्नवाढीसाठी महापालिकेने 27 ऑगस्ट, 2015 रोजी चालू रेडीरेकनरनुसार भाडे आकारणीचा निर्णय घेतला. त्याला गाळेधारकांचा विरोध आहे. त्यामुळे थकबाकी वाढतच गेली आहे.

शहरात महापालिकेच्या मालकीचे 2 हजार 113 दुकानगाळे आहेत. त्यांपैकी 1391 गाळेधारकांची मुदत संपली आहे. तसेच महापालिकेच्या मालकीच्या 800 च्या वर खुल्या जागा असून, त्यांपैकी 422 जागांचे भाडेकरार संपले आहेत. महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा हा मोठा स्रोत आहे. सवलत योजनेचा आजअखेर फक्त 413 गाळेधारक व खुल्या जागा भाडेकरूंनी लाभ घेतला आहे.

Back to top button