नाशिक : जिल्ह्यातील 7354 जलस्त्रोतांचे करणार ‘जिओ टॅगिंग’ | पुढारी

नाशिक : जिल्ह्यातील 7354 जलस्त्रोतांचे करणार ‘जिओ टॅगिंग’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दूषित पाण्यापासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्यमान उंचावण्याच्या द़ृष्टीने यावर्षीही जिल्ह्यातील जलस्त्रोतांची मोबाइल अ‍ॅपद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानास 11 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. अभियान 31 मेपर्यंत असून, जिल्ह्यातील सर्व 7354 स्त्रोतांचे पाणी नमुने गोळा करून त्याचे जिओ टॅग करण्यात येत आहे. दरम्यान, इगतपुरी तालुक्यातील 7 पाण्याचे स्त्रोत हे धरणांच्या पाण्यात असल्याने तेथून पाण्याचे नमुने घेऊन जिओ टॅग करण्यात आले.

नाशिक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष हा उपक्रम राबवित असून, रासायनिक पाणी नमुने तपासणी अभियानाचे काम जिल्ह्यात 100 टक्के पूर्ण करण्यात यावे. या बाबतच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व संबंधित विभागाला दिल्या असून, त्यानुसार हे अभियान यशस्वी करण्यासाठी पाणी व स्वच्छता विभाग व आरोग्य विभाग यांच्यामार्फत काम करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचे 98 टक्के काम पूर्ण झाले असून, महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याचे सर्वाधिक काम झालेले आहे.

या अभियानात जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहायक यांच्या सहकार्याने जिओ फेन्सिंग मोबाइल अ‍ॅपद्वारे नमुने गोळा करण्यात येत असून, गोळा करण्यात आलेल्या पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी उपविभागीय प्रयोगशाळांतून करण्यात येत असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी दिली.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे हाच प्रशासनाचा मुख्य हेतू असून, त्यानुसार जिल्ह्यात पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे.
– लीना बनसोड,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.

हेही वाचा :

Back to top button