नगर: पुढारी वृत्तसेवा
नगर शहराची मुहूर्तमेढ 28 मे 1490 रोजी झालेल्या 'जंग-ए-बाग' लढाईत गनिमी कावा वापरून मिळालेल्या विजयाच्या वेळी रोवली गेली. येत्या 28 तारखेला शहर आपला 532 वा स्थापना दिन साजरा करत आहे. हे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या हेरिटेज वॉक सप्ताहाला रविवारी भल्या सकाळी 'किल्ला प्रदक्षिणे'ने प्रारंभ झाला.
पुणे, मुंबई आणि औरंगाबादमध्ये नाहीत, इतक्या जुन्या ऐतिहासिक वास्तू अहमदनगर शहर आणि परिसरात आहेत. त्यांची ओळख करून घेण्यासाठी हेरिटेज वॉक सप्ताह साजरा होत आहे. प्रथम किल्ल्याला भेट देण्यात आली. किल्ल्याची तटबंदी आणि बुरूजांवरून फिरत तिथे घडलेला इतिहास जाणून घेण्यात आला.
सन 1942 च्या चले जाव आंदोलनात नगरच्या किल्ल्यात कैदी म्हणून राहावे लागलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंतप्रधान झाल्यानंतर किल्ल्याला दिलेल्या भेटीत जेथे भाषण केले, तो तिसर्या क्रमांकाचा बुरूज, स्वातंत्र्य मिळाले, त्या दिवशी आचार्य नरेंद्र देव आणि नगरचे सुपूत्र रावसाहेब पटवर्धन यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा तिरंगा फडकवला गेला तो नऊ क्रमांकाचा फत्ते बुरूज, ब्रिटिशांचा देशातील सगळ्यात मोठा युनियन जॅक जेथून उतरवला गेला, तो इलाही बुरूज आणि देशात पहिल्यांदा तयार करण्यात आलेला भग्नावस्थेतील झुलता पूल पाहताना तो इतिहास डोळ्यासमोर साकारत होता.
नगरमधील सगळ्यात मोठी आणि जुनी चिंचेची झाडं किल्ल्यात आहेत. ते पाहिल्यानंतर 'नेता कक्षा'स भेट देण्यात आली. पंडित नेहरू, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल आदी 12 राष्ट्रीय नेत्यांनी सर्वात दीर्घ आणि शेवटचा कारावास भोगला, त्या कोठड्यांमध्ये त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
सन 1857 च्या स्वातंत्र्य समराआधी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी ब्रिटिशांविरोधात उठाव करून त्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. कैद्यांनी बंड करून दरवाजा तोडत मुक्त होण्याचा प्रयत्न केला होता. किल्ल्याच्या इलाही बुरूजातील तो तुरूंग पाहताना त्या अनाम क्रांतिकारकांना अपोआपच नमन झाले.
हेरिटेज वॉकची सांगता खंदकाबाहेर नव्याने उभारलेला 105 फूट उंचीचा झेंडा आणि सन 1971 च्या बांगला युद्धातील विजयाचं स्मारक असलेल्या 'स्पिरीट ऑफ आर्मड' परिसरात झाली. भूषण देशमुख आणि अमोल बास्कर यांनी उपस्थितांना माहिती दिली.