नाशिक : स्मार्ट सिटीचा ‘स्मार्ट’ कारभार ; तीन वर्षांत पाचच ठिकाणी बसले फ्लड सेन्सर्स | पुढारी

नाशिक : स्मार्ट सिटीचा ‘स्मार्ट’ कारभार ; तीन वर्षांत पाचच ठिकाणी बसले फ्लड सेन्सर्स

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ
स्मार्ट सिटी कंपनीमार्फत शहरात जुने नाशिक आणि पंचवटी गावठाण भागातील विकासकामे आणि प्रकल्पांबाबत एकच म्हणावे लागले ते म्हणजे विलंब… नागरिकांना त्रास अन् व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान. कंपनीचा कालावधी संपुष्टात आला. परंतु, अजूनही गेल्या सहा वर्षांत कामे पूर्ण होऊ शकलेली नाही. आता तर पावसाळा पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेला असताना तीन वर्षांत 20 पैकी केवळ पाच ठिकाणी फ्लड सेन्सर्स बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून गावठाण भागातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज यासह प्रोजेक्ट गोदा अशी महत्त्वाची कामे सध्या सुरू आहेत. यापैकीच प्रोजेक्ट गोदा प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड तसेच इतरही गोदाघाट या ठिकाणी सुशोभीकरणाची कामे स्मार्ट सिटी कंपनीमार्फत हाती घेण्यात आली अ ाहेत. त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर पुलाखाली अ‍ॅटोमॅटिक गेट बसविण्यात येणार असून, पावसाळ्यात पुराच्या पाण्याची पातळी समजावी आणि महापुरामुळे होणारी जीवित तसेच वित्तहानी टळावी यासाठी फ्लड सेन्सर्स बसविण्यात येणार होते. त्या अनुषंगाने साधारण तीन वर्षांपूर्वी याबाबतचा ठराव स्मार्ट कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर झाला. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदाराला कार्यारंभ आदेशही देण्यात आला. परंतु गेल्या तीन वर्षांत हे काम पूर्ण होऊ शकले नाही. पुराच्या पाण्याचा धोका ओळखून त्याबाबत नागरिकांना अवगत करण्यासाठी शहरासह परिसरात गोदावरी नदी, नासर्डी तसेच वालदेवी नदी या ठिकाणी 20 फ्लड सेन्सर्स बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत रामवाडी पुलावरील सिद्धेश्वर मंदिर, वालदेवी नदी, पपया नर्सरी येथील नासर्डी नदी, मुंबई नाका येथील नासर्डी नदी पूल, पिंपळगाव येथील पूल अशा पाचच ठिकाणी सेन्सर्स बसविण्यात आले असून, अद्याप 15 ठिकाणी बसविणे बाकी आहे.

आपत्ती निवारणाबाबत उपाययोजना
पुराच्या पाण्याची पातळी वाढल्यास त्याचा अलर्ट सेन्सर्सच्या माध्यमातून स्मार्ट सिटी कंपनीच्या कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रूममध्ये जाईल आणि तेथून तत्काळ ही माहिती आपत्ती निवारण कक्षाबरोबरच महापालिका, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग अशा महत्त्वाच्या यंत्रणांना पाठविली जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित यंत्रणा अलर्ट होऊन तत्काळ संबंधित आपत्ती निवारणाबाबतच्या उपाययोजना करू शकतील.

पब्लिक मेसेजिंग सिस्टिम
फ्लड सेन्सर्सअंतर्गत पब्लिक मेसेजिंग सिस्टिम बसविली जाणार आहे. या सिस्टिमसाठी शहरात नागरिकांची गर्दी होणार्‍या तसेच महत्त्वाच्या ठिकाणांवर भोंगे आणि स्क्रिन उभारण्यात येणार आहेत. अर्थात, फ्लड सेन्सर्स बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर स्क्रिन आणि भोंगे बसविण्याचे काम हाती घेतले जाणार असून, या ठिकाणावरून नागरिकांना सावध केले जाईल. शहरातील कोणत्या पुलावरील मार्ग बंद आहे किंवा खुला आहे तसेच इतरही घटनांबाबतची माहिती पब्लिक मेसेजिंग सिस्टिमद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येईल. पावसाळा सुरू होण्यापूर्वी 20 पैकी उर्वरित 15 ठिकाणी फ्लड सेन्सर बसविण्याचा दावा स्मार्ट सिटी कंपनीने केला आहे.

हेही वाचा :

Back to top button