नाशिक : शेतातील कचरा पेटविल्याने भीषण आग, तीन दुकाने बेचिराख, 10 दुकाने वाचली | पुढारी

नाशिक : शेतातील कचरा पेटविल्याने भीषण आग, तीन दुकाने बेचिराख, 10 दुकाने वाचली

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
अज्ञाताने शेतातील कचरा पेटविला अन् त्याची धग जवळील दुकानांपर्यंत पोहोचून तीन दुकाने बेचिराख झाली. मालेगाव-मनमाड रस्त्यावरील मनमाड-चौफुली परिसरात शुक्रवारी (दि. 6) सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली.

मुख्य मार्गालगत व्यापार्‍यांची एकमेकांना लागून दुकाने आहेत. त्यापाठीमागे शेती आहे. तेथे अज्ञाताने कचरा पेटविला होता. गवत पेटून ती धग संजय येवले यांच्या रुपेश ट्रेडिंग या रद्दीच्या दुकानापर्यंत पोहोचली. उन्हाचा प्रकोप त्यात ठिणगी पडल्याने कागदाने क्षणात पेट घेतला. प्रचंड उष्णता निर्माण होऊन आगीने रौद्र रूप धारण केले. त्यात जवळच्या जलील शेख यांच्या एसके टायर्स व एमएम ल्युब्रिकेंटस् या सोहेल कच्छी यांच्या प्रोसेसिंग युनिटनेही पेट घेतला. टायर्स आणि ऑइल वेगाने पेटले. आगीचे लोळ आणि धूर दूरवरून दिसून येत होता. सर्व्हे नंबर 554/4 वरील या अग्नितांडवाला मालेगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आटोक्यात आणले. किल्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

10 दुकाने वाचली
भीषण आगीची खबर तत्काळ अग्निशमन दलाला माहिती मिळाल्याने वेगात बंब दाखल झाले. नऊ बंबांच्या सहाय्याने आग वेगात आटोक्यात आली. परिणामी, जवळील 10 दुकाने वाचल्याचे अधीक्षक संजय पवार यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button