कॅलिफोर्निया; पुढारी ऑनलाईन
महाराष्ट्राचा प्रतिभावान धावपटू अविनाश साबळेने ५ हजार मीटर शर्यतीत बहादूर प्रसादचा ३० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये अविनाशने १३:२५.६५ वेळ नोंदवत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. साबळे यांनी येथे १२ वा क्रमांक मिळवला.
बीडच्या अविनाश साबळेने याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. पण त्याला ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात यश आले नव्हते. अविनाश साबळे हा बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा सुपूत्र आहे. अविनाश साबळे हा शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे घर शेतीतून मिळणाऱ्या उत्पनातून चालतं. शाळेला तो लहानपणी ६ किलोमीटरचं अंतर पार करुन जात होता. लहानपणापासून त्याला खेळाची आवड आहे.
याआधी अविनाशने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत मोठी कामगिरी बजावली होती. त्याने ३ हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम मोडत काढला होता. यामुळे जागतिक स्पर्धेसाठी तो पात्र ठरला होता. स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता.
"आम्ही अविनाशला आशियाई क्रीडा स्पर्धेत ३ हजार मीटर स्टीपलचेस आणि ५ हजार मीटर या दोन्ही प्रकारात उतरवण्याची तयारी करत आहोत. कारण त्याला दोन्ही स्पर्धांमध्ये पदकांची संधी आहे," असे भारतीय अॅथलेटिक्सचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले आहे.