नाशिक : ’अभय’मध्ये 356 ग्राहक लाभार्थी; 86 थकबाकीमुक्त तर 1.42 लाख जणांना लाभ | पुढारी

नाशिक : ’अभय’मध्ये 356 ग्राहक लाभार्थी; 86 थकबाकीमुक्त तर 1.42 लाख जणांना लाभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : थकबाकीदार असणार्‍या, कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांसाठी महावितरणने विलासराव देशमुख अभय योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत थकबाकी भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील 356 ग्राहकांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केला आहे. आतापर्यंत 86 जणांनी 23 लाख 26 हजारांचा भरणा करून ते थकबाकीमुक्त झाले आहेत.

महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणूून कायमस्वरूपी वीज खंडित केलेल्या ग्राहकांसाठी अभय योजना आणली आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत मुदत असलेल्या योजनेत कृषी वगळता, अन्य ग्राहकांना थकबाकीची एकरकमी रक्कम भरून थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात कायमस्वरूपी वीज खंडित असलेले 1 लाख 42 हजार 228 ग्राहक आहेत. त्यांच्याकडे मूळ थकबाकी 85 कोटी 38 लाख इतकी आहे. या ग्राहकांनी अभय योजनेअंतर्गत सहभाग नोंदविल्यास मूळ थकबाकीवरील व्याज व दंड रकमेत 11 कोटी 92 लाख रुपयांची सवलत व पुनर्जोडणीची संधी मिळणार आहे. पण, ग्राहकाला नवीन वीजजोडणी घ्यायची असल्यास नियमानुसार पुनर्वीज जोडणी शुल्क व अनामत रक्कमेचा भरणा करावा लागेल. तसेच ज्या ग्राहकांचा न्यायालयीन वाद सुरू आहे, अशांना योजनेत सहभागी होता येणार नसल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

अशी मिळणार सवलत : कृषी ग्राहक वगळून, सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी अभय योजना लागू आहे. थकबाकीदारांना योजनेत थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरावी लागेल. त्यामुळे त्यांच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ होइल. थकबाकीदारांनी मुद्दलाची रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के व लघुदाब ग्राहकांना 10 टक्के थकीत मुद्दलात अधिकची सवलत मिळेल. ग्राहकांना रक्कम सुलभ हप्त्यांनी भरावयाची असल्यास मुद्दलाच्या 30 टक्के एकरकमी भरणे अत्यावश्यक असून, त्यानंतर उर्वरित रक्कम 6 हप्त्यांत भरता येईल.

हेही वाचा :

Back to top button