नाशिक : मनपा करणार पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन | पुढारी

नाशिक : मनपा करणार पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील पाथर्डी, सिन्नरफाटा, चेहेडी पंपिंग तसेच आडगाव परिसरात कमी दाबाने व अनियमित होणार्‍या पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारींची आयुक्त रमेश पवार यांनी दखल घेतली आहे. त्यानुसार त्यांनी पाणीपुरवठा विभागाला शहराच्या पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या सोमवारपर्यंत फेरनियोजनाचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.

शहराला गंगापूर धरणसमूह, दारणा तसेच मुकणे या तीन धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. आतापर्यंत गंगापूर धरणसमूहातून 2930, तर मुकणेतून 920 अशाप्रकारे एकूण 3851 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. महापालिकेच्या आरक्षणाच्या द़ृष्टीने सध्या गंगापूर धरणसमूहात 1069, मुकणेत 579, तर दारणेत 100 असे एकूण 1748 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. 31 जुलैपर्यंत आरक्षित पाणीसाठा वापरावयाचा आहे. सध्या दररोज 540 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा धरणांमधून होत असून, उन्हाच्या तीव्रतेमुळे यंदा पाण्याच्या पुरवठ्यात दररोज सरासरी दहा दशलक्ष लिटरने वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांना पाणीकपातीच्या संकटाचा येत्या काही दिवसांत सामना करावा लागणार आहे.

पाथर्डी-वडनेरगेट, पांडवलेणी परिसर, आडगाव परिसर तसेच नाशिकरोडच्या सिन्नरफाटा पूर्वेकडील चेहेडीपर्यंतच्या भागाला नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींची आयुक्त तथा प्रशासक पवार यांनी गंभीर दखल घेत शहरातील पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.

गंगापूर धरणातून 14.51, तर मुकणेतून दररोज 4.56 एमएलडी पाणी उचलले जाते. काही ठिकाणचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मुकणेतून दररोज दोन ते तीन एमएलडी पाण्याचा अतिरिक्त उपसा करण्याबाबतचा पाणीपुरवठा विभागाचा प्रस्ताव आहे.

शोभेच्या झाडांसाठी सांडपाण्याचा वापर
महापालिकेतर्फे अनेक वाहतूक बेट, रस्ते दुभाजकांमध्ये विविध प्रकारच्या शोभेची झाडे लावण्यात आलेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. आगामी पाणीटंचाईचा विचार करता संबंधित झाडांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता मलनिस्सारण केंद्रांतून (एसटीपी) बाहेर पडणारे प्रक्रियायुक्त सांडपाणी वापरण्याचे आदेश आयुक्त पवार यांनी दिले आहेत. तसेच शहरातील मनपाच्या किती उद्यानांमध्ये बोअरवेल आहे याची माहिती मागविण्यात आली आहे. तसेच उद्यानात पाण्याची व्यवस्था नसल्यास सांडपाणी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा :

Back to top button