DC Vs SHR दिल्लीचा हैदराबादला दणका; डेव्हिड वॉर्नर आणि रोव्हमन पॉवेलची स्फोटक खेळी | पुढारी

DC Vs SHR दिल्लीचा हैदराबादला दणका; डेव्हिड वॉर्नर आणि रोव्हमन पॉवेलची स्फोटक खेळी

मुंबई; वृत्तसंस्था : ऋषभ पंतच्या दिल्लीने (DC Vs SHR) आपला पाचवा विजय नोंदवला आहे. त्यांनी सनरायझर्स हैदराबादला गुरुवारच्या लढतीत 21 धावांनी पराभूत केले. दिल्लीने आपली गुणसंख्या दहावर नेली, तर हैदराबादचेही दहा गुण झाले आहेत.

विजयासाठी 208 धावांचे महाकाय लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या हैदराबादची (DC Vs SHR) सुरुवात खराब झाली. निर्धारित 20 षटकांत त्यांना 8 गडी गमावून 186 धावांपर्यंतच मजल मारणे शक्य झाले. सलामीवीर अभिषेक शर्मा याला खलील अहमदने 7 धावांवर बाद करून हैदराबादला पहिला धक्‍का दिला. फलकावर तेव्हा 8 धावा लागल्या होत्या. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सन हाही अवघ्या 4 धावा करून बाद झाला. तो एन्रिच नोर्टजेची शिकार ठरला. राहुल त्रिपाठीने 22 धावांची खेळी केली. त्याने 1 चौकार व 2 षटकार खेचला. तथापि, मिशेल मार्शने त्याला टिपले आणि हैदराबादची हालत 3 बाद 37 अशी केली. त्यानंतर निकोलस पूरन आणि एडन मार्कराम यांनी सूत्रे आपल्या हाती घेतली. मार्कराम खूपच आक्रमक दिसत होता. त्याने 42 धावांची खेळी करताना 25 चेंडू घेतले. 4 चौकार व 3 षटकार हे त्याचे मुख्य फटके ठरले. खलील अहमदने त्याला मोहात पाडले आणि सीमारेषेवर कुलदीप यादवने त्याचा झेल छान टिपला. आता हैदराबादच्या गोटात चिंतेचे ढग दाटून यायला सुरुवात झाली होती. झालेही तसेच. पूरनने 62 धावा करून सामन्यात रंग भरले. पण, ते पुरेसे ठरले नाहीत. दिल्लीकडून खलील अहमदने तीन तर शार्दूल ठाकूरने दोन गडी बाद केले. याखेरीज एन्रिच नोर्टजे, मिशेल मार्श आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक मोहरा टिपला.

नाणेफेक जिंकण्यात सुदैवी ठरलेला हैदराबाद सनरायझर्सचा (DC Vs SHR) कर्णधार केन विलियम्सन याने दिल्लीला फलंदाजीसाठी पाचारण केले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि रोव्हमन पॉवेल यांनी केलेल्या वादळी खेळ्यांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 3 गडी गमावून 207 धावांचा डोंगर उभारला. दिल्लीने हैदराबादच्या गोलंदाजीच्या ठिकर्‍या उडवल्या. सलामीवीर मनदीप सिंग याला अनुभवी भुवनेश्‍वर कुमारने भोपळाही फोडू दिला नाही. तसेच मिशेल मार्श केवळ 10 धावा करून तंबूत परतला. मात्र, वॉर्नरने धुवाँधार खेळी केली. त्याने 58 चेंडूंचा सामना करताना 92 धावा चोपल्या. त्यात डझनभर चौकार आणि तीन उत्तुंग षटकारांचा समावेश होता. पॉवेलने तर कहरच केला. या पठ्ठ्याने तब्बल सहा वेळा चेंडू प्रेक्षकांत भिरकावून दिला आणि तीन वेळा चेंडूला सीमापार पाठवले. 35 चेंडूंत त्याने 67 धावांची जबरदस्त खेळी करून उपस्थित रसिकांचे मनोरंजन केले.

कर्णधार ऋषभ पंत (DC Vs SHR) हा स्थिरावत आहे असे वाटत असतानाच 26 धावांची चटपटीत खेळी करून तंबूत परतला. त्याने 16 चेंडूंचा सामना करताना एक चौकार आणि 3 षटकार लगावले. एरवी उमरान मलिक हा हैदराबादचा भरवशाचा गोलंदाज. पण, त्याच्या 4 षटकांत दिल्लीने 52 धावा लुटल्या. त्याला एकही बळी मिळवता आला नाही. केवळ भुवनेश्‍वर कुमारने 4 षटकांत 25 धावा देऊन एक गडी बाद केला. सीन अबोट आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी 1 मोहरा टिपला. एडन मार्कराम याने एकच षटक टाकले व त्यात त्याला 11 धावा मोजाव्या लागल्या. एकूणच हैदराबादच्या गोलंदाजांची जोरदार पिटाई झाली. त्यांना खेळपट्टीकडून किंचितही साथ मिळाली नाही.

Back to top button