नाशिक : नाशिक परिमंडळात 4 हजार कोटींचा भरणा; महावितरणचे डिजिटलायजेशन : राज्यात 72 टक्के ऑनलाइन व्यवहार | पुढारी

नाशिक : नाशिक परिमंडळात 4 हजार कोटींचा भरणा; महावितरणचे डिजिटलायजेशन : राज्यात 72 टक्के ऑनलाइन व्यवहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील वीजग्राहकांनी गेल्या वर्षभरात 72 टक्के वीजबिलांची रक्कम ऑनलाइन भरली आहे. ग्राहकांनी भरलेली रक्कम 53 हजार 50 कोटी रुपये असून, त्यामध्ये नाशिक परिमंडळाच्या 4 हजार 262.57 कोटी रुपयांचा समावेश आहे. दरम्यान, उच्चदाब ग्राहकांनी 98 टक्के ऑनलाइन बिले भरली.

महावितरणने बदलत्या काळानुसार ग्राहकांना ऑनलाइन वीजबिलांची रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांचा ऑनलाइन बिले भरण्याकडे कल वाढतो आहे. राज्यात एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत घरबसल्या ग्राहकांनी 19 हजार 347 कोटी 55 लाख रुपये भरले असून, त्याचे प्रमाण 49.40 टक्के आहे. तर उच्चदाब वीजग्राहकांनी आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे 34 हजार 602 कोटी 88 लाख रुपयांची (98.01 टक्के) बिले भरणा केला. महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणार्‍या ग्राहकांना वीजबिलाच्या 0.25 टक्के किंवा जास्तीत जास्त 500 रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. ग्राहकांनी भरलेल्या ऑनलाइन वीजबिलांच्या रकमेवर नजर टाकल्यास महावितरणच्या ’गो ग्रीन’ या संकल्पनेची वाटचाल यशस्वी होताना दिसून येत आहे. येत्याकाळात वीजबिलांची 100 टक्के वसुली ऑनलाइन करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

ग्राहकांनी भरलेली ऑनलाइन रक्कम : महावितरणच्या परिमंडळनिहाय ऑनलाइन वीजबिल भरण्याची आकडेवारी बघता औरंगाबाद परिमंडळातील ग्राहकांनी 3,960.96 कोटींचा भरणा केला. याशिवाय लातूरमध्ये 710.24 कोटी, नांदेडला 542 कोटी, भांडूपमध्ये 9,931.03 कोटी, जळगावला 1,475.33 कोटी, कल्याणला 6,640. 17 कोटी, कोकणात 769.78 कोटी, नाशिकमध्ये 4,262.57 कोटी, अकोल्यात 639.37 कोटी, अमरावतीमध्ये 833.70 कोटी, चंद्रपूरला 943.66 कोटी, गोंदियात 548.64 कोटी, नागपूरला 3,838.73 कोटी, बारामतीत 4,824.67 कोटी, कोल्हापूरला 3,518.84 कोटी तर पुण्यात 10,510.73 कोटी रुपयांचा भरणा ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने केला.

हेही वाचा :

Back to top button