सांगली : कामगारांमधील ठेकेदारी मोडून काढू ; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत | पुढारी

सांगली : कामगारांमधील ठेकेदारी मोडून काढू ; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

सांगली : पुढारी वृत्तसेवा

असंघटित कामगारांना पुरेसे वेतन आणि न्याय मिळत नाही. अधिकार्‍यांमुळे कामगारांच्यात काही ठेकेदार तयार झाले आहेत. ही ठेकेदारी मोडून काढण्यात येईल. स्थानिक कामगारांच्यावर अन्याय झाल्यास प्रसंगी मंत्री असलो तरी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

येथील वसंतदादा सूतगिरणी जवळील चाणक्य चौक येथे कामगार दिनानिमित्त आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
मंत्री सामंत म्हणाले, कामगारांना अनेक ठिकाणी न्याय मिळत नाही.त्यांची उपेक्षा होते. माझ्याकडे जरी कामगार खात्याचा कार्यभार नसला तरी कामगार महामंडळात बाराशे कोटी रुपये आहेत. ही रक्कम कामगारांना मिळायला हवी. त्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून मी ते मिळवून देणार आहे. कामगारांच्यात काही ठेकेदार तयार झाले आहेत. अधिकार्‍यांना हाताशी धरून त्यांचा मनमानी उद्योग सुरू आहेत. ही ठेकेदारी मोडून काढण्यात येईल. त्यासाठी मी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करेन. यावेळी त्यांनी मेळाव्याचे संयोजक, शिवसेना व कामगार नेते हरिदास लेंगरे करत असलेल्या कामाचे कौतूक केले.

हरिदास लेंगरे म्हणाले, सर्व सामान्य कामगारांच्या घामाला दाम मिळण्यासाठी माझा हा लढा सुरू आहे. त्याला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आता मंत्र्यांचे पाठबळ मिळाले असल्याने हा लढा आणखी तीव्र होईल. आमदार अनिल बाबर, जिल्हा प्रमुख संजय विभुते आदींची भाषणे झाली. यावेळी संघटक दिगंबर जाधव, हरिदास पडळकर, पांडुरंग सरगर, प्रदीप शिंदे, राहुल दुधाळ, पंडित माळी आदी उपस्थित होते.

हेही वाचा  

Back to top button