‘अल्टिमेटम’ला सरकार भीक घालत नाही, अजित पवार यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

‘अल्टिमेटम’ला सरकार भीक घालत नाही, अजित पवार यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिककरांनी मनसेला तीन आमदार व महापालिकेची सत्ता दिली. पण, काहीतरी चुकले म्हणूनच सत्ता पुन्हा काढून घेतली. काही जण स्वत:ला हुकूमशहा समजत असून, अल्टिमेटम देत आहेत. पण, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असून, सरकार कोणत्याही अल्टिमेटमला भीक घालत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये सोमवारी (दि. 2) आयोजित पक्षाच्या शहर-जिल्हा पदाधिकार्‍यांच्या बैठकीप्रसंगी ना. पवार बोलत होते. ते म्हणाले की, औरंगाबादमधील सभा म्हणजे पूर्वीचीच कॅसेट होती. खा. शरद पवार व राष्ट्रवादीवगळता त्यात नवीन काही नव्हते. जीवनात कष्ट नको. सूर्य मावळल्यानंतर सायंकाळी सभा घ्यायच्या. प्रसिद्धीसाठी राजकारणातील खा. पवारांसारख्या शक्तिस्थळावर हल्ला करीत समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशासमोरील महागाई व अन्य प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भोंग्यांसारखे मुद्दे पुढे केले जात आहेत.

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून 4 तारखेचा अल्टिमेटम दिला आहे. अल्टिमेटम द्यायला काय जाते? राज स्वत: कार्यकर्त्यांसोबत जाऊन भोंगे काढणार का, असा सवाल ना. पवार यांनी उपस्थित केला. आदेश देणे सोपे असते. पण, कारवाई व केसेस कार्यकर्त्यांवर पडतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने भोंग्यांबाबत कारवाई केली. तेथे सर्वधर्मीय स्थळांवर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करताना पोलिसांना त्यांचे काम योग्य पद्धतीने करू द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

'राज यांनी समोरची सुपारी घेतली' :

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी आपली सुपारी घेतली होती. आपल्या उमेदवारांच्या सपोर्टमध्ये ते बोलत होते. पण यंदा त्यांनी समोरच्यांची सुपारी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या मुखी भाजपची भाषा असेल, अशा शब्दांत ना. पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

राज यांची केली नक्कल
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी नाकाला रूमाल लावत राज ठाकरे यांची नक्कल केली. 'काय ते एकदा नाक शिंकरून घ्या', असे त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news