राज्यातील कृषी पुरस्कारांच्या रकमेत पाचपट वाढ ; अजित पवार यांची घोषणा | पुढारी

राज्यातील कृषी पुरस्कारांच्या रकमेत पाचपट वाढ ; अजित पवार यांची घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कृषी विभागातर्फे दिल्या जाणार्‍या विविध पुरस्कारांच्या रकमेत पाच पटीने वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. शेतकर्‍यांना पुरस्कार वितरण झाल्यानंतर ना. पवार यांनी शेतकर्‍यांमुळेच कोरोनासारख्या महामारीत देशाची अर्थव्यवस्था स्थिर राहू शकली, असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दूरद़ृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याबाबत अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार घोषणा करतील, असे सांगितले होते. त्याचाच धागा पकडत अजित पवार यांनी आजच्या 297 पुरस्कारांसाठी 51 लाख रुपये खर्च आला आहे. पुढील वर्षापासून या पुरस्कारांच्या रकमेत पाच पट वाढ करण्यात येईल, असे जाहीर केले. ना. पवार म्हणाले, शेतकर्‍यांना आपण शून्य टक्के व्याजदराने पीककर्ज देणे सुरू केले आहे. शेतकर्‍यांनी खासगी सावकारांकडून 10 टक्के दराने कर्ज घेण्यापेक्षा बँकांकडून पीककर्ज घ्यावे व त्याची नियमित परतफेड करावी. दोन लाखांवरील कर्जमाफीबाबत राज्याची परिस्थिती सुधारल्यास शब्द पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले.

ऊस वाहतुकीसाठी अनुदान :

सध्या उसाचा गळीत हंगाम सुरू असून, आम्ही दोन दिवसांपूर्वीच सर्व शेतकर्‍यांचा ऊस तुटून जाईपर्यंत कारखाने सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ऊस कारखानदारांना वाहतुकीसाठी प्रतिटन पाच रुपये किलोमीटर याप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे. तसेच साखर उतारा घटला असल्यामुळेही त्यासाठीही अनुदान दिले जाणार असल्याचे ना. पवार यांनी जाहीर केले.

हेही वाचा :

Back to top button