नाशिक : वणवामुक्तीसाठी पर्यावरणमित्रांचे साकडे, पोलिस अधीक्षकांनीही दिले आश्वासन | पुढारी

नाशिक : वणवामुक्तीसाठी पर्यावरणमित्रांचे साकडे, पोलिस अधीक्षकांनीही दिले आश्वासन

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील वणव्याच्या वाढत्या घटनांमुळे निसर्ग व जैवविविधतेचे कधीही भरून न येणारे अपरिमित नुकसान झाले आहे. वणवा लागताच हातातली कामे सोडून जीव धोक्यात टाकणार्‍या पर्यावरणमित्रांनी वणवामुक्तीसाठी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी निश्चित याकामी आम्ही आपल्यासोबत आहोत, वणवामुक्तीसाठी कार्यशाळा व वणवा विझवणार्‍यांसाठी सुरक्षा साधने, वनव्यवस्थापन समित्यांना प्रशिक्षण दिले जाईल, असे आश्वासनही जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी पर्यावरणप्रेमींना दिले.

नाशिक जिल्ह्यातील ब्रम्हगिरी, मोरधन, रामशेज किल्ला, हरसूल घाट, मायना डोंगर, मातोरी गायरान, पांजरपोळ, संतोषा (बेळगाव ढगा), मातोरी येथील सुळा डोंगराला वणवा लागण्याच्या घटना या दोन महिन्यांत अनेकदा घडल्या. या घटनांची वनविभागाला खबर देण्यापासून जीव धोक्यात टाकून ओली बारदाने, झाडांच्या हिरव्या फांद्यांनी वणवा झोडपून विझवण्याचे काम शिवकार्य गडकोट संस्था, वृक्षवल्ली फाउंडेशन, दरीमाता पर्यावरण, मंडळे व व्यक्तींनी केली आहेत.

वन्यप्राणी, दुर्मीळ वनौषधी याचे कुठलेही ऑडिट वन, पर्यावरण व स्थानिक गावांनी केले नाही. दरवर्षी वणवा थांबवण्यासाठी, त्याची दाहकता कमी करण्यासाठी जागृती व जाळपट्टे उभारणीसाठी टास्क फोर्सने उपाय सुचवले. मात्र, वणवे काही थांबले नाहीत. वणवा लावणारे मोकाट असून, वनसंपदा असुरक्षित आहे, याआधीच वणवामुक्तीसाठी उपायांवर संबंधित विभागाचे गांभीर्य नसल्याची तक्रार यावेळी वणवा विझविणार्‍या पर्यावरणमित्रांनी केली.  यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस अधिकारी टेंभेकर, तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्यासह शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, दरीआई माता पर्यटन व पर्यावरणाचे भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे, प्रदीप पिंगळे, जितेंद्र साठे उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button